Beed Crime : मोठी बातमी! बीड जिल्हा हादरला; सरपंच पतीचं अपहरण करून केला खून

  • Written By: Published:
Beed Crime : मोठी बातमी! बीड जिल्हा हादरला; सरपंच पतीचं अपहरण करून केला खून

Sarsancha Murdere in Beed district : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (Beed) ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पवनचक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. तर, या घटनेने मस्साजोग गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मयत संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून तोडफोड केली. त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण केलं असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात आज दुपारनंतर दाखल करण्यात आली होती. मात्र, काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावाकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली जात आहे.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. तर, हा खून मस्साजोग येथील पवनचक्कीच्या वादातून आणि खंडणीच्या वादातून झाला आहे. याविषयी मी पोलीस अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना फोन केला. मात्र, ते देखील माझा फोन उचलत नाहीत. असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

मी अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला, पोलीस अधीक्षकांना फोन केला. मात्र, ते माझा फोन घेत नाहीत. जे कोणी दोषी आहेत, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. कॉल ट्रेस करून आरोपींवर कारवाई करा. राजकारणाची प्रवृत्ती याच्या पाठीमागे आहे. कोणी सत्तेत येत असेल आणि ते खून करत असतील, तर ती बाब अत्यंत निंदणीय आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून काल खून करण्यात आला आहे. याप्रकरणी आता मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी बीड- अंबाजोगाई महामार्ग अडवत मस्साजोग येथे रास्ता रोको केला आहे. दरम्यान यामुळे बीड-अंबाजोगाई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube