Nagpur News : नागपूर मध्य मतदारसंघातील लढत (Nagpur News) विशेष चर्चेत होती. येथील लढत खरंतर दोन मित्रांची होती. प्रवीण दटके आणि बंटी शेळके या दोघांत ही लढत होती. येथे आरोप प्रत्यारोप झाले पण राज्याची खरी राजकीय संस्कृती देखील पहायला मिळाली. प्रवीण दटके विजयी झाल्यानंतर पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी (Bunty Shelke) स्वतः त्यांची भेट घेत अभिनंदन केलं. बंटी शेळके यांचा पराभव नेमका कसा झाला याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत धक्कादायक खुलासा स्वतः काँग्रेस नेते बंटी शेळके यांनी केला आहे. निवडणुकीतील पराभवाची नाराजी त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर (Congress Party) व्यक्त केली आहे.
बंटी शेळके म्हणाले, माझा पराभव झाला हे खरंय. मागील निवडणुकीत मी 70 हजार मतं घेतली होती. या निवडणुकीत 80 हजार मतदान घेतलं. खरंतर ही आपली संस्कृती आहे की पराभवानंतर मी प्रतिस्पर्धी उमेदवाराचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं. त्यांचं दर्शन घेतलं. द्वेषाची भावना भाजपाच्या नेत्या कार्यकर्त्यांत आरएसएसमध्ये असेल पण आमच्या मनात द्वेषाची कोणतीच भावना नाही.
तुमच्या पक्षाकडून तुम्हाला मदत झाली नाही हे खरं आहे का असा प्रश्न विचारला असता शेळके म्हणाले, मला पक्षानं चिन्ह दिलं जी थोडीफार ताकद आहे तीही दिली. तरी सुद्धा मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो. माझ्या आणि शेळके परिवाराच्या रक्ताच्या थेंबाथेंबात काँग्रेस आहे आणि यात काहीच शंका नाही. 2019 मध्ये फक्त चार हजार मतांच्या फरकाने मी निवडणुकीत पराभूत झालो होतो. पण शहरातील जे मोठे नेते आहेत त्यांच्याकडून अशी अफवा पसरवण्यात आली की याला तिकीट मिळणार नाही.
एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना बोलावण्यात आलं. तिथं नेमकं काय घडलं याची कल्पना नाही. पण निवडणुकीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नेते आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर होते. पण बाकीचे सर्वच जण पश्चिम नागपुरात होते. पश्चिम नागपुरात विकास ठाकरे निवडणूक जिंकले. सर्वे रिपोर्टच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही निवडणूक जिंकत होतो. पण एक वेगळ्या प्रतीचं स्नेह त्यांचं माझ्याप्रति आहे, अशा सूचक शब्दांत बंटी शेळके यांनी इशाराही दिला.
विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात येणार? मुंबई अन् नागपूरमध्ये होणार खलबतं
2019 मध्ये मी निवडणुकीत पराभूत झालो होतो. पॅनलमध्ये देखील माझं नाव नव्हतं. चार हजार मतांनी जर एखादा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला असेल तर पॅनलमध्ये सर्वात अगोदर त्याचच नाव असतं. 2019 ते 2024 पर्यंत या गोष्टी घडत गेल्या. मात्र त्यानंतरही मी ही निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढलो. मतदारांपर्यंत पोहोचलो. त्यांनी आशीर्वाद म्हणून मला 80 हजार मते दिली.
मी या सर्व गोष्टी पक्ष नेत्यांच्या कानावर घातल्या आहेत. तुम्ही मला पक्ष चिन्ह दिलं पण संघटन मात्र दिलं नाही. स्थानिक पातळीवरील काँग्रेसने जर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली असेल. निवडणूक काळात जे ते लोकं कुठे सहभागी झाली नसतील या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. या सर्वांवर पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे अशी मी माझी बाजू मांडल्याचे बंटी शेळके म्हणाले.