PM Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi) वर्ध्यात होते. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात मोदींनी केंद्र सरकारबरोबरच राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) कामांचं तोंडभरू कौतुक केलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. आगामी काळात भाजपाचं राजकारण कसं असेल याचेही आडाखे त्यांच्या या वक्तव्यावरून बांधले जाऊ लागले आहेत.
मागील सरकारने विश्वकर्मा बंधुंची चिंता केली असती तर त्यांना मदत झाली असती. पण काँग्रेसने एससी, एसटी आणि ओबीसींना जाणूनबुजून पुढे जाऊ दिले नाही. आमच्या सरकारने यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली. आज आकडे सांगतात की या योजनेचा सर्वाधिक लाभ एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील कारागिरांना होत आहे. माझं आता म्हणणं आहे की तुम्ही फक्त कारागीर राूह नका. उद्योजक बना. व्यवसायी व्हा. यासाठी आम्ही कारागिरांच्या उत्पादनांना एमएसएमईचा दर्जा दिला आहे. त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंगही करत आहोत. व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करत आहोत. कौशल्य विकास अभियानातून कोट्यावधी युवकांना प्रशिक्षण दिले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“काँग्रेसला महाराष्ट्रात संधी देऊ नका, त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहा” : PM मोदी
टेक्सटाइल इंडस्ट्री आघाडीवर आणण्याचं काम सरकारकडून होत आहे. हजारो वर्षांचा देशाचा गौरव पुन्हा स्थापित करण्याचं आमचं उद्दीष्ट आहे. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीसाठी आमच्या सरकारने महाराष्ट्राची निवड केली. कारण ही योजना फक्त सरकारचा उपक्रम नाही. ही योजना जुनी कौशल्य वापर करण्याचा रोडमॅप आहे. इतिहासात भारताच्या कौशल्य समृद्धीची अनेक उदाहरणे आहेत. आपला देश कापड निर्मितीत जगात आघाडीवर होता. मातीची भांडी आणि भवनांच्या डिझाईनला तोड नव्हती.
पण नंतर गुलामीच्या काळात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्ये संपवण्यासाठी अनेक षडयंत्रे रचली. देशाचं आणखी दुर्दैव म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांनीही या कौशल्यांचा कधीही सन्मान केला नाही. या सरकारांनी कायमच उपेक्षा केली. त्यामुळे भारत मागे पडला होता. सत्तर वर्षांनंतर आमच्या सरकारने या कौशल्यांना नवी ऊर्जा देण्याचा संकल्प केला. यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. पारंपारिक कौश्ल्यांचा सन्मान करणं आणि विश्वकर्मा बंधूंच्या जीवनात समृद्धी आणणं हे या योजनेचं उद्दीष्ट आहे, असे पीएम मोदी म्हणाले.
या योजनेद्वारे आतापर्यंत देशातील वीस लाख लोकांना जोडले आहे. आठ लाखांपेक्षा जास्त शिल्पकार आणि कारागिरांना स्कील ट्रेनिंग दिली. महाराष्ट्रात साठ हजार लोकांना प्रशिक्षण मिळाले. साडेसहा लाखांपेक्षा जास्त विश्वकर्मा बंधूंना आधुनिक उपकरणे दिली आहेत. इतकेच नाही तर प्रत्येक लाभार्थ्याला पंधरा हजार रुपयांचे ई-व्हाऊचर दिले जात आहे. तसेच विना गॅरंटी तीन लाखांचे कर्जही दिले जात आहे.
Video : PM मोदींसमोरचं CM एकनाथ शिंदेंचे डिमोशन; आता मुख्यमंत्री कोण?
मोदी पुढे म्हणाले, राज्यात याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने कपाशीला ताकद देण्याऐवजी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार केला. नंतर 2014 मध्ये फडणवीसांनंतर खरं काम सुरू झालं. अमरावतीत टेक्सटाईल पार्क आला. शिंदे सरकाने शेतकऱ्यांचे वीजबिल झिरो केले. सिंचनाच्या समस्या सोडविण्यसाठी प्रयत्न सुरू केले अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. सरकारच्या कामांचा उल्लेख करताना मोदींनी भाषणात डबल इंजिनचं सरकार असा उल्लेख केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या इंजिनाचा उल्लेख केला नाही.