अमरावती : बहुजन महापार्टीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे (Harshvardhan Baliram Khobragade) यांनी तिवसा विधानसभा (Teosa Vidhansabha) निवडणुकीतून माघार घेत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंबामुळे तिवसा विधानसभा निवडणुकीचे चित्र पलटणार असून यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आता मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात नुकतेच बहुजन महापार्टीचे उमेदवार खोब्रागडे यांनी पाठिंबा पत्र काढून महायुतीवर घणाघाती टीका केली आहे. राज्यातील महायुती आणि देशातील केंद्र सरकार यांची ध्येयधोरणे ही शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बहुजन विरोधी आहेत. राज्यात महायुती सरकारच्या काळात महिला अत्याचारांच्या घटनात कमालीची वाढ झाली असून हे गंभरी आहे. जातीपातीचे, धर्माचे राजकारण करून शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे भ्रष्ट महायुती सरकार करत आहे, असा हल्लाबोल खोब्रागडे यांनी केला.
वाढती महागाई, वाढती बेरोगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, समाजातील युवकांना आणि युवतींना मिळत नसलेले रोजगार हे भाजपचे पाप आहे. तिवसा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक बटोंगे तो कटोंगे ही भाषा वापरत आहेत. भापजचे उमेदवार हे कंत्राटदार आहेत.
जनतेचे, जनसामान्यांचे, बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्याच नेतृत्वाची खऱ्या अर्थाने गरज आहे, यशोमती ठाकूर यांनी सर्व समाज घटकांना आजवर आमदार म्हणून न्याय दिला, असंही खोग्रागडे म्हणाले.
भाजप धर्मांध शक्ती वापरत बहुजनांमध्ये फूट पाडून या ठिकाणी सत्तेवर येण्याच्या अयशस्वी प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार यशोमतीताई यांचे मताधिक्य कमी होऊ नये, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीची गरज असल्याने मी माझी उमेदवारी कुठल्याही दबावात न येता मागे घेऊन आमदार यशोमतीताई ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे खोब्रागडे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
यशोमती ठाकूर यांना सर्व समावेशक पाठिंबा मिळत असल्याने त्या प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे.