नवनीत राणा भाजपचा उमेदवार पाडून लोकसभेचा वचपा काढणार ? अमरावतीचं राजकीय गणित लई ‘डेंजर’
Vidhan Parishad Election-काँग्रेसकडून थेट माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यात शिंदेसेनेचा उमेदवार रिंगणात उतरू शकतो.
Vidhan Parishad Election: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेसाठी (Vidhan Parishad Election) आमदारांची निवड करण्यासाठी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जवळ-जवळ सर्वच ठिकाणी महायुतीकडे संख्याबळ आहे. पण अमरावतीमध्ये मात्र वेगळं चित्र आहे. येथे सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे. पण काँग्रेस व इतर विरोधक तोडीस तोड आहे. त्यात भाजपसाठी नवी डोकेदुखी समोर आली आहे. माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana), आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी भाजपच्या उमेदवाराला जाहीर विरोध दर्शविला आहे. त्यात शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसकडून थेट माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यात शिंदेसेनेचा उमेदवार रिंगणात उतरू शकतो, त्यामुळे अमरावतीमध्ये तिरंगी लढत होऊ शकते. असं झालं तरी संख्याबळानुसार कोण बाजी मारेल ? राणा दाम्पत्याचा भाजपच्या उमेदवाराला खरा विरोध आहे का ? भाजपकडून कोणता शब्द घ्यायचा आहे हेच पाहुया…
विधानपरिषदेसाठी 453 मतदार
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पक्षीय बलाबल पाहिले, तर महायुतीकडे संख्याबळ आहे. भाजपकडे सर्वाधिक 152 सदस्य आहेत. तर शिवसेनेकडे 20, राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार) यांच्याकडे 32 सदस्य आहेत. तर राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडे 26 सदस्य आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे 119 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे (शरद पवार) 13, ठाकरेसेनेकडे 18 मतदार आहेत. विधानपरिषदेचे सदस्य बच्चू कडू यांच्या प्रहारकडे 21 मतदार आहेत. तर एमआयएम 16, बीएसपीकडे 3, समाजवादी पार्टीकडे 2, भाकपकडे 1 एक सदस्य आहेत. त्यामुळे छोट्या पक्षांना महत्त्व येईल.
प्रवीण पोटेंचे नाव आघाडीवर पण राणांचा विरोध
भाजपकडून उमेदवारीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) यांचे नाव आघाडीवर आहे. पोटे यांना या मतदारसंघातून 2012 ते 2024 असे दोन टर्म नेतृत्व केलं आहे. पोटेंना रवी राणा यांनी उघडपणे विरोध केला आहे. तर नवनीत राणा देखील पोटेंच्या उमेदवारीच्या विरोधात असल्याच्या बोलले जात आहे. त्यामुळे पोटेंच्या उमेदवारीमध्ये ‘राणा’ फॅक्टर अडसर ठरू शकतो. या विरोधामागे लोकसभा निवडणुकीचे कारण आहे. नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार असताना प्रवीण पोटे यांनी उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोटे राणांचा प्रचारात उतरले होते. परंतु नवनीत राणा यांचा पराभव झाला. पोटेंनी दगाफटका केल्याचा संशय राणा यांना आहे. त्यामुळे त्या पोटे यांना विरोध करत आहे. भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे यांचे नाव आघाडीवर आहे. नवनीत राणा या नावाबाबत सकारात्मक आहे. रवी राणा यांनी पोटे यांना उमेदवारी दिली तर स्वतंत्र उमेदवार रिंगणार उतरवू असे संकेत दिल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. रवी राणा विरोधात गेल्यास 26 मते निर्णायक ठरू शकतात.
काँग्रेस यशोमती ठाकूर यांना मैदानात उतरविणार ?
भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे एक वजनदार नेता आहे. तो नेता म्हणजे माजी मंत्री यशोमती ठाकूर. ठाकूर यांनीच ही निवडणूक लढावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. यशोमती ठाकूर यांना आघाडीतील राष्ट्रवादी, ठाकरेसेनेची साथ मिळाले. इतर छोटे पक्षबरोबर आल्यास अमरावती मतदारसंघात भाजपविरुद्ध व काँग्रेस अशी टफ फाइट होऊ शकते. तर अकोला येथील माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया हेही इच्छुक आहेत. ते काँग्रेस किंवा अपक्ष लढू शकतात.
येथील राजकीय गणितं बघता भाजपला इतर जागा सहज निवडून आणता येतील. परंतु अमरावतीची जागा जिंकून आणण्यासाठी कसोटी लागणार हे तर सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे.