विधानसभेत विक्रम पाचपुतेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर अखेर कारवाई; सेलिब्रिटींना FDA ची नोटीस

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी 4 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.3

Untitled Design (79)

Untitled Design (79)

Vikram Pachpute’s follow-up efforts bear fruit : तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्यासारख्या आरोग्यास घातक उत्पादनांच्या अप्रत्यक्ष जाहिरातींविरोधात अखेर मोठी कारवाई सुरू झाली आहे. इलायची, सौफ अथवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू, पान मसाला आणि गुटखा ब्रँडचा प्रचार करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी झालेल्या अभिनेते आणि सेलिब्रिटींना अन्न व औषध प्रशासनाने अर्थात FDA ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे या कारवाईमागे जवळपास एक वर्षाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी 4 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. इलायची, सौफ किंवा तत्सम उत्पादनांच्या जाहिरातींच्या माध्यमातून तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याच्या ब्रँडना अप्रत्यक्ष प्रसिद्धी दिली जात असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला होता. अशा जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेते आणि सेलिब्रिटींची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला.

एनडीएच्या चर्चांवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका; ‘आपण विरोधातच आहोत’, कार्यकर्त्यांना दिला संदेश

विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार, एका बाजूला तंबाखूजन्य पदार्थांवर निर्बंध आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच ब्रँडच्या नावाने इलायची, सौफ किंवा इतर उत्पादनांच्या जाहिराती करून ब्रँडची ओळख आणि लोकप्रियता टिकवून ठेवली जाते. या जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध अभिनेते आणि सेलिब्रिटी सहभागी होत असल्यामुळे त्या ब्रँडबाबत समाजात, विशेषतः युवकांमध्ये आकर्षण निर्माण होते. परिणामी अप्रत्यक्षपणे आरोग्यास हानिकारक उत्पादनांना प्रोत्साहन मिळण्याचा धोका वाढतो. जाहिरात इलायचीची किंवा सौफची असली तरी तिच्यामागे जर तंबाखू, पान मसाला किंवा गुटख्याच्या ब्रँडची प्रसिद्धी होत असेल, तर केवळ उत्पादनाचे नाव बदलून सामाजिक जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी विधानसभेत मांडली होती.

या मागणीचा पाठपुरावा करताना जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला. अखेर 16 ऑगस्ट 2026 रोजी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या संबंधित अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे या प्रकरणात प्रत्यक्ष प्रशासकीय कारवाईला सुरुवात झाली आहे. ही नोटीस केवळ औपचारिकता नसून पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईची पहिली पायरी मानली जात आहे. त्यामुळे संबंधित कलाकारांना त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना आमदार विक्रम पाचपुते यांनी समाधान व्यक्त केले आहे. विधानसभेत प्रश्न मांडणे ही केवळ सुरुवात असते, मात्र त्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तो प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाईपर्यंत नेणे अधिक महत्त्वाचे असते, असे त्यांनी म्हटले आहे. 4 जुलै 2025 रोजी मांडलेल्या मागणीवर आज प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली असून उशीर झाला असला तरी जनहिताच्या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. जनहिताचा विषय असेल तर अंतिम परिणाम मिळेपर्यंत तो सोडायचा नाही, हीच आपली भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखेर शहजाद पूनावालांचा राजीनामा; काही घटना अन् लोकांनी निर्णय घ्यायला भाग पाडलं म्हणत पत्रक जारी

दरम्यान, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेल्या या पावलाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. सार्वजनिक आरोग्य, विशेषतः युवकांचे संरक्षण आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. देशभरात तंबाखू आणि गुटखा उत्पादनांवर थेट जाहिरातबंदी असतानाही सरोगेट जाहिरातींच्या माध्यमातून ब्रँड प्रमोशन सुरू असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होत आहे. अशा परिस्थितीत FDA ने सुरू केलेली ही कारवाई भविष्यात अशा जाहिरातींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि सेलिब्रिटींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे. आता कारणे दाखवा नोटिसांनंतर पुढे कोणती कारवाई होते आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना कितपत प्रभावी आळा बसतो, याकडे राज्यासह देशभराचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version