एनडीएच्या चर्चांवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका; ‘आपण विरोधातच आहोत’, कार्यकर्त्यांना दिला संदेश
पक्षाच्या महत्वाच्या बैठकीत शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आपण विरोधातच आहोत.
Sharad Pawar’s clear stance : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या दिल्लीतील भेटीनंतर या चर्चांना आणखी वेग आला होता. मात्र, आता या सर्व चर्चांवर स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या महत्वाच्या बैठकीत शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आपण विरोधातच आहोत. कोणत्याही कार्यकर्त्याने संभ्रमात राहू नये. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. सर्वांनी जोमाने कामाला लागावे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे आठही खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. या सलग भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीत राहणार की एन्डीएकडे वाटचाल करणार, याबाबत मोठी चर्चा रंगली होती.
बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; जलाभिषेकासाठी आलेल्या 7 भाविकांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी
या सर्व घडामोडींनंतर पक्षाच्या खासदारांची शरद पवार यांच्यासोबाबत बैठक झाली. त्यामध्ये पक्षाची आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांची तयारी यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. याच बैठकीत शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत यासंदर्भात महत्वाचे भाष्य केले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांनी पक्ष एनडीएसोबत जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदीय अधिवेशनातील सरकारविरोधातील आपल्या भूमिकेची आठवण करून दिली.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपण संसदेत ज्या ताकदीने आवाज उठवत आहोत, त्याच ताकदीने रस्त्यावरही संघर्ष केला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांवर लढणे हेच आपले प्राधान्य आहे, असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्याचे निर्देश दिले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेली पक्षाची पदे तातडीने भरावीत आणि संघटन विस्तारावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अखेर शहजाद पूनावालांचा राजीनामा; काही घटना अन् लोकांनी निर्णय घ्यायला भाग पाडलं म्हणत पत्रक जारी
सुप्रिया सुळे यांनी लवकरच राज्यव्यापी दौरा करण्याचे संकेतही दिले. या दौऱ्यात जनतेच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडली जाणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
शनिवार आणि रविवारी पार पडलेल्या या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. विविध जिल्ह्यांतील पक्षबांधणी, सदस्य नोंदणी, संघटन विस्तार आणि आगामी कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. सध्या फक्त कोकण विभागातील जिल्ह्यांचा आढावा बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील संभ्रम दूर होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी काळात विरोधी पक्ष म्हणूनच आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.