Cannabis seized : अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. काही दिवसांपूर्वी पारनेर आणि शेवगाव तालुक्यात गांजा लागवड केल्याचं प्रकरणं समोर आली होती. या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी 250 किलो गांजा जप्त केला होता. आता शिर्डीतही (Shirdi) अवैध धंदे वाढत असून या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस (Shirdi Police) सरसावले आहेत. शिर्डी पोलिसांनी काल रात्री छापा टाकून 3 लाख रुपये किमतीचा तब्बल 21 किलो गांजा जप्त केला. (21 kg Cannabis seized by Shirdi police)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके यांना एका गोपनीय माहितीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून शिर्डीतील हेलिपॅड रोडवरील एका खोलीवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना गांजाचा मोठा साठा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी चांगदेव कोते याला अटक केली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
शिर्डी पोलिसांनी एकूण 2 लाख 91 हजार 200 रुपये किमतीचा 20 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरून वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, खाकी रंगाचा चिकट टेप, कटर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Dream Girl 2 Poster: आयुष्मान खुराना स्टारर ‘ड्रीम गर्ल 2’ चे नवीन पोस्टर प्रदर्शित
पोलिसांनी घटनास्थळावरून चांगदेव कोते याला ताब्यात घेतले असून दत्तात्रय बाबुराव कर्पे, अनिता दत्तात्रय कर्पे, शुभम दत्तात्रय कर्पे या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. या संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश ओला (पोलीस अधीक्षक, शहर), स्वाती भोर (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके (डीवायएसपी), पीआय नंदकुमार दुधाळ, एपीआय प्रवीण दातरे, पोलीस हवालदार बिरदवडे, गोंधे, भारमल, गोलवड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे. आजही शिर्डीत अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, गुटखा विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू असून यात तरुण पिढी बरबाद होत आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर शिर्डी पोलिसांनी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.