अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) दुपारी शाळेतून परत येत असताना रासने नगर जवळ त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी आज (9 ऑक्टोबर) या हल्ल्याबाबतची माहिती माध्यमांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. (Attack on Senior Social Worker and Principal Heramb Kulkarni)
याबाबत प्रतिमा कुलकर्णी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आजारी असल्याने शनिवारी दुपारी शाळेतून सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरुन ते घरी येत होते. त्यावेळी अहमदनगरमधील रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली. लोखंडी रॉडने दोन्ही पायावर, दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला इजा झाली असून 4 टाके पडले आहेत.
डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले. अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. यानंतर ते रस्त्यावर पडले. हल्ल्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले आणि तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण 48 तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर ज्येष्ठ्य पत्रकार निखील वागळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉडने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे. आपण सर्वांनी शासनाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे. सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेरंब कुलकर्णी हे विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर नेहमीच व्यक्त होत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांनी शाळेजवळ असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी मनपाला पत्र दिले होते. या पत्रानंतर पालिकेने देखील सदर अतिक्रमणे तातडीने हटवली होती. यामुळे तर हा हल्ला झाला नाही ना? अशी चर्चा सध्या शहरात सुरु आहे.