सातारा : एका बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार फ्लेक्स म्हणून झळकत असले आणि ते भव्य रॅलीही काढत असले तरी साताऱ्याच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या सर्व जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत. भाजप नेते उदयनराजे यांची समजूत काढतील, असे म्हणत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला (BJP) सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar has given a clear indication that NCP will not give up Satara seat to BJP.)
त्याचवेळी साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिक लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत विचारले असता भुजबळ यांनी या चर्चा खऱ्या असल्याचे सांगितले. जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल बैठक घेत आहेत. मात्र आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार की भाजप याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
मागील आठवडाभरापासून दिल्ली मुक्कामी असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती आहे. त्यांच्या उमेदवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. आज त्यांचे सातारला आगमन होणार असून त्यांच्या समर्थकांकडून जिल्हा प्रवेश सीमेवर शिरवळ- निरा नदीजवळ जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. हा स्वागतसोहळा दणक्यात करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी रात्रंदिवस राबताना दिसत आहेत.
दरम्यान, सातारा भाजपला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीने माढा आणि नाशिक मतदारसंघांवर दावा केला असल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ऐनवेळी छगन भुजबळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, अशी चर्चा महायुतीच्या गोटात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माढा लोकसभेसाठी आग्रही असला, तरी हा मतदारसंघ भाजप सोडण्याची शक्यता कमी आहे.