Maharashtra Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यातच महाविकास आघाडीत बिघाडी करणारी बातमी सोलापुरातून आली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठा गेम झाला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. मतदानानंतर शिंदे म्हणाले, की सोलापूर दक्षिण मतदारसंघात आम्ही अपक्ष उमेदवार धर्मराज कराडी यांना पाठिंबा देत आहोत. या मतदारसंघात ठाकरे गटाने रजनीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, आज ऐन मतदानाच्या दिवशीच सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
IPS Officer Transfer : आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूर ग्रामीणला नवे पोलिस अधीक्षक
शिंदे म्हणाले, हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, ठाकरे गटाने हट्टाने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. आम्ही माजी मंत्री दिलीप माने यांना येथून तिकीट देण्याची इच्छा व्यक्त करत होतो. परंतु, पक्षाने त्यांना चिन्ह दिलं नाही. त्यामुळे आता आम्ही येथील अपक्ष उमेदवार धर्मराज कराडी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. कराडी हेच आता भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना मात देतील असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
मतदानाच्या आधीच खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला होता. काही मतदारसंघात काँग्रेसचे लोक सांगली मॉडेल लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सांगली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
संजय राऊत यांनी व्यक्त केलेला हा संशय काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला नाकारला होता. आघाडी धर्माचं पालन केलं जाईल. जो पालन करणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला होता. तरी देखील काँग्रेस नेते शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला समर्थन जाहीर केलं आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Maharashtra Assembly Election : सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; नाना पटोलेंचे संकेत काय?
सोलापूर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, 2014 पासून या मतदारसंघात भाजपाचे सुभाष देशमुख विजयी होत आहेत. 2019 मध्येही देशमुखांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या बाबा देशमुख यांना 27 हजार मतांनी पराभव केला होता. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती. जागावाटपा नुसार ठाकरे गटाने या मतदारसंघात उमेदवार दिला. परंतु, शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांनी ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे.