Download App

‘माझा विशालला शब्द, खासदारकीला आडवा येणार नाही’; ‘सांगली’साठी नकाराचं कारण कदमांनी सांगितलंच..

सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. दुसरं म्हणजे मी विशाल पाटीलला शब्द दिला होता की खासदारकीला कुणीही आडवे येणार नाही. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहिल अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची इनसाईड स्टोरी सांगितली.    

कदम म्हणाले, दोन महिन्यांचा काळ उत्सुकतेचा, निराशेचा आणि संघर्षाचा होता. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला मानणारा आहे. येथील प्रत्येक गावात काँग्रेसच्या विचारधारेला मानणारा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. १९४७ पासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 2014 आणि 2019 चा अपवाद वगळता येथे काँग्रेसचेच खासदार निवडून आले आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची मागणी होती.

Sangli News : खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल, मैदान सोडून पळू नकोस; विशाल पाटलांना थेट आव्हान

काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची अशी इच्छा होती की मी लोकसभा निवडणूक लढवावी. परंतु, माझ्या काही व्यक्तिगत कारणांमुळे नी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आताच सोडायचं नाही. सांगलीच्या बाबतीत थोडीशी घाई झाली. जागावाटपात आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. पिढ्यानपिढ्या आम्ही सांगली जिल्ह्यात काम केलंय. लोकांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी झालो आहोत. सहकारी संस्था आम्ही उभ्या केल्यात. त्यामुळे आमचं सांगलीकरांशी एक भावनिक नातं आहे. त्यामुळे माझी ती भावना होती.

मी लढण्याची चर्चा झाली होती. पण मला लढायचं नाही हे मी सांगितलही होतं. विशाल पाटील राजकारणात चांगल्या प्रकारे सक्रिय झाले होते. आम्ही ताकदीने काम करत होतो. विश्वजीत कदम ज्याच्या पाठीशी तो खासदार होऊ शकतो हे संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती आहे. मी विशालला शब्द दिला होता की खासदारकीत आम्ही कुणीही आडवे येणार नाही. जरी पक्षश्रेष्ठींची इच्छा असेल तर तो प्रश्न मी माझ्या पातळीवर सोडविल. पण, मी तुझ्या पाठीशी आहे. हे मी विशालला सांगितलं होतं.

Sangli Lok Sabha : “मी माघार घ्यायला तयार पण..” विशाल पाटलांच्या गुगलीने ‘मविआ’ कोंडीत

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले सांगलीत आले होते. त्या दिवशीच्या कार्यक्रमात मी सांगलीत काय काय घडलं याचा सगळा घटनाक्रम मांडला. मी परखड बोललो. पण मला त्याची पर्वा नाही. आहे ती घटना मी मांडली. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात सांगलीच्या जागेसाठी लढले ही वस्तूस्थिती आहे. जागावाटपाच्या वाटाघाटीत राज्यातले नेते कमी पडले का या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले, की या सगळ्यात काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला त्याला कमकुवतपणा म्हणता येणार नाही.

follow us