कोल्हापूरः माझ्या पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. त्यामुळे शिंदे गटामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनेकवेळी ते गंमतीने बोलतात. त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे मला माहिती नाही, असे केसरकर म्हणाले.
हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमिनीचा घोटाळ्याचा आरोप झाला. विरोधकांनी सत्तार यांना घेरले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्यावर सत्तार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावरील आरोपानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे माझी बाजू मांडली आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील काही लोक असू शकतात. मंत्रिपद न मिळालेल्या नेत्याचे माझ्याविरोधात षडयंत्र असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला होता.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते अनेकदा गंमतीने बोलतात. त्यांचे बोलणे किती गंभीरपणे घ्यायचे हे मला माहिती नाही. पक्षातील बाबीची बाहेर चर्चा करायची गरज नाही. काही झाले असेल तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. काय असेल त्यावर आम्ही चर्चा करू, असे केसरकर म्हणाले.