Download App

रामराजे निंबाळकर-मोहिते पाटलांची ‘टाईट फिल्डिंग’; माढ्यात रणजितसिंहांचा गेम होणार?

माढा : “खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी माढ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत. सर्वांत जास्त विकासकामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकरांचा समावेश आहे.” असे जाहीर कौतुक करुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून निंबाळकर यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला.

मात्र या गोष्टीला 24 तास होण्याच्या आतच विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांना धक्का बसला, माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. ही भेट म्हणजे रणजीतसिंह निंबाळकर यांच्याविरोधातील फिल्डिंग आहे का? असा सवाल विचारला जात आहे. (MLC Srimant Ramraje Nimbalkar met former Deputy Chief Minister Vijaysinh Mohite-Patil)

रणजीतसिंह निंबाळकरांविरोधातील फिल्डिंग?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या गटाने रणजीतसिंह नाईक निंबाळकरांसोबत एकदिलाने काम केले. मोहिते पाटलांच्या माळशिरसच्या बालेकिल्ल्यात नाईक निंबाळकरांना एक लाखांचे निर्णायक मताधिक्य मिळाले. याच मताधिक्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र सुरुवातीला मधुर असणाऱ्या या संबंधांमध्ये काहीच दिवसांत मिठाचा खडा पडला. निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते-पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगा घेतल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. त्यातही निंबाळकर यांनी मोहिते-पाटील विरोधकांशी जवळीक वाढविली. त्यामुळे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला आहे.

नुकतेच “माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे”, असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा करत होते. मात्र यंदा पाडव्याच्या मुहूर्त साधून त्यांनी शड्डूच ठोकला. वर वर जरी धैर्यशील मोहिते पाटलांची घोषणा वाटत असली तरी हा थेट संघर्ष संपूर्ण मोहिते-पाटील कुटुंब विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर असाच असल्याचे दिसून येते. निंबाळकर यांनी घेतेल्या पंग्यातूनच मोहिते पाटलांनी आपला दावा ठोकल्याचे बोलले जाते.

“काही गोष्टींवरुन मतभेद” : नाईक निंबाळकर-मोहिते पाटलांमधील वाद मिटविण्यात बावनकुळेही फेल

दुसऱ्या बाजूला रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. दोघांचे अर्धा टक्काही जमत नाही. रणजितसिंह आधी काँग्रेसमध्ये होते, तर रामराजे राष्ट्रवादीमध्ये. मात्र तरीही दोघांमधून विस्तवही जात नव्हता. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत. रणजीतसिंहांनी मला खूप त्रास दिला आहे, असे आरोप रामराजे जाहिररित्या आजही करतात. अशात रामराजे निंबाळकरांनी अजितदादांसोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपच्या पंगतीत येऊन बसले.

रामराजे निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. मतदारसंघातील फलटण आणि माण-खटाव या पट्ट्यात रामराजे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे मत इथला निकाल बदलवू शकतो. अशात आता माढ्याची जागा भाजपला गेल्यास आणि उमेदवारी निंबाळकर यांना दिल्यास त्यांना फलटण आणि माण-खटावमध्ये रामराजेंच्या मदतीची आवश्यकता लागणार हे नक्की आहे. मात्र आता रामराजे निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच शंकर कारखान्याच्या विस्तारीकरण कार्यक्रमात मोहिते-पाटील यांनी रामराजे निंबाळकर यांच्यासह जवळपास 64 आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. त्यानंतर आता बावनकुळेंची पाठ वळताच रामराजेंनी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली. त्यांच्या या भेटींमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पण वरील घडामोडींमुळे आणि समीकरणांमुळे ही भेट म्हणजे रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात फिल्डिंग आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

माढ्यात रणजीतसिंहांचा गेम होणार?

आता प्रश्न उरतो तो म्हणजे माढ्यात रणजीतसिंहांचा गेम होणार का? तर रामराजे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येत आहेत हे ओळखून रणजीतसिंह निंबाळकर यांनीही माढा मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा  शिंदे हे उघडपणे रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत. तर 2019 मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढविली होती त्या शिंदेंनी निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली आहे.

ST बॅंकेच्या संचालक पदावरून सौरभ पाटलांची हकालपट्टी, गुणरत्न सदावर्तेंचे बॅंकेवरील वर्चस्व संपुष्टात!

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे देखील निंबाळकरांच्या मागे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यातही निंबाळकरांनी पहिल्या मिनिटापासून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली होती. त्यानंतर मतदारसंघातून जाता जाता बावनकुळेंनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत. सर्वांत जास्त विकासकामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे.” असे जाहीर कौतुक माढ्यातून निंबाळकर यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला आहे.

या सगळ्या घडामोडींंमुळे माढ्यातील सत्तासंघर्षात काय काय होणार याकडे आगामी काही दिवस तरी सर्वांचेच लक्ष लागून राहणार हे नक्की.

follow us