“काही गोष्टींवरुन मतभेद” : नाईक निंबाळकर-मोहिते पाटलांमधील वाद मिटविण्यात बावनकुळेही फेल
माढा : भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांच्यातील वितुष्ट मिटविण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनाही अपयश आल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांनी नुकताच दोन दिवसांचा माढा लोकसभेचा दौरा केला, पण दौऱ्याच्या शेवटी पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी दोघांमध्ये काही गोष्टींवरुन मतभेद आहेत, मनभेद नाहीत अशी जाहीर कबुली दिली. पण यामुळे दोन दिवसांत त्यांना हेच मतभेद संपविण्यात अपयश आले आहे, असे स्पष्ट दिसून येते. (BJP state president Chandrashekhar Bawankule also failed to resolve the dispute between BJP MP Ranjitsinh Naik Nimbalkar and former Deputy Chief Minister Vijaysinh Mohite Patil)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एकदिलाने काम केले. मोहिते पाटील यांच्या माळशिरसच्या बालेकिल्ल्यात नाईक निंबाळकरांना एक लाखांचे निर्णायक मताधिक्य मिळाले. याच मताधिक्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र सुरुवातीला मधुर असणाऱ्या या संबंधांमध्ये काहीच दिवसांत मिठाचा खडा पडला.निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते-पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगा घेतल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात.त्यातही निंबाळकर यांनी मोहिते-पाटील विरोधकांशी जवळीक वाढविली.त्यामुळे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष मिटविण्याची जबाबदारी या दौऱ्यात बावनकुळे यांच्या खांद्यावर होती.
Ajit Pawar : ‘मी शिरुरबाबत जे सांगितलं तेच फायनल’; थेट मतदारसंघात येत अजितदादांनी ठणकावलं!
बावनकुळे यांचा फलटणपासून दौरा सुरु झाला. त्यावेळीपासूनच निंबाळकरांनी शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली होती. संध्याकाळी बावनकुळे माळशिरसमध्ये दाखल झाले. त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी विश्रामगृहावर त्यांचे स्वागत केले. यावेळी बावनकुळे यांच्यासोबत खासदार रणजित निंबाळकरही उपस्थित होते. हेच पाहून अगदी बालेकिल्ल्यातच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे बाहेर गाडीतच बसून होते. अकलूज येथ लोकसभा वॉरियर्सच्या बैठकीत निंबाळकर आणि मोहिते पाटील एकत्रित होते, पण बाहेर आलेल्या फोटोंमध्ये दोन्ही नेत्यांची तोंडे दोन दिशेला होती. रात्री बावनकुळे मोहिते पाटलांच्या घरी भोजनसाठी गेले तेव्हा खासदार नाईक निंबाळकर माळशिरसमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी निघून गेले.
यानंतर पंढरपूरमध्ये बोलताना, बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांच्या वादावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले. ते म्हणाले. माढ्यात कोणताही तिढा नाही. हा फक्त बाहेरुन दिसत आहेत. काही गोष्टींवरुन फक्त मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. मतभेद तर कुटुंबातही होतात. एका आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या दोन भावांमध्येही मतभेद असतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या पक्षात मतभेद होणे सहाजिक आहे. ते कोअर ग्रुपमध्ये होते, सुपर वॉरिअर्सच्या बैठकीत पूर्णवेळ होते. काही लोक फक्त गैरसमज निर्माण करत आहेत. मध्ये दरी निर्माण करत आहेत. तुम्हीही गैरसमज करु नका, असा विनंतीवजा सल्लाही दिला.
‘शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला
माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटलांचा शड्डू :
“भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे” असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा करत होते. मात्र नुकतचं पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी शड्डूच ठोकला आहे. वर वर जरी धैर्यशील मोहिते पाटलांची घोषणा वाटत असली तरी हा थेट संघर्ष संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर असाच आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाच संघर्ष भाजपच्या आणि नाईक निंबाळकर यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
निंबाळकरांचे जाहीर कौतुक :
पंढरपूरमध्ये बोलताना बावनकुळे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे जाहीर कौतुक केले. निंबाळकर यांनी माढ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत. सर्वांत जास्त विकासकामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. तिकिटाचे अधिकार माझ्या हातात नसले तरीही नाईक निंबाळकरांचे काम चांगले आहे, असे जाहीर कौतुक करत त्यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले. तसेच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये बुथनिहाय 51 टक्के मते घेऊन महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा दावा केला.