पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रवेशाला सध्या तरी ब्रेक लागला आहे. भालके यांच्या हैदराबाद दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आल्याने ते प्रवेश न करताच माघारी फिरले असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी भालके यांच्यासाठी पुण्याहून हैदराबाला येण्यासाठी पक्षाचे खास विमान पाठविले होते. त्यामुळे भालके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. (ncp-leader-Bhagirath Bhalke-got-phone-from-ncp-state president-jayant-patil)
दरम्यान, याबाबत LetsUpp मराठीशी बोलताना, भालके म्हणाले, चंद्रशेखर राव यांनी आपल्याला केवळ चर्चेसाठी आणि तेलंगणाताली योजनांबद्दल माहिती देण्यासाठी बोलावून घेतले होते. त्यांनी आपल्याला पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले आहे. मात्र पंढरपूरमध्ये येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भालके म्हणाले, राज्यातील सर्व योजना, शेतकऱ्यांबाबत, सर्वसामान्यांच्या योजनांबाबत माहिती दिली. तेलंगणात आम्ही या योजना 2014 पासून राबवत आहे. याच योजना आता आम्हाला महाराष्ट्रातही राबवायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत यावं असं म्हणतं त्यांनी आम्हाला पक्षप्रवेशाचं आमंत्रण दिलं आहे. पण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच मी पुढील निर्णय घेणार आहे. मी आता परत येण्यासाठी निघालो आहे.
तुमची नाराजी दुर करण्यासाठी शरद पवार यांचा फोन आला का? असं विचारलं असता भालके म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आला होता. आता मी परत आल्यानंतर मुंबईत जाऊन त्यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी चर्चा करुन मतदारसंघातील स्थिती आणि बाकीच्या गोष्टी सांगणार आहे. त्यादिवशीच्या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांच्या भावनाही सांगणार आहे, असं भालके यांनी स्पष्ट केलं.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश झाला. शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणातील शेतकरी मेळाव्यात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना पवार यांनी पाटील यांना आगामी विधानसभा उमेदवारीबाबत संकेतही दिले. त्यामुळे भालके यांच्यासह राष्ट्रवादीतील कल्याणराव काळे आणि युवराज पाटील ही नेतेमंडळी नाराज आहे. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भालकेंनी शक्तीप्रदर्शन करत विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले.
याच दरम्यान, पवार यांनी सर्व नाराजांना सोलापुरात बोलावून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फारसे यश आलेले नसल्याचे सांगितले जात आहे. पवार यांचा दौरा पार पडल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच भालके यांना राव यांच्या पक्ष कार्यलयातून संपर्क करण्यात आला. इतकचं नाही तर भालके यांना भारत राष्ट्र समितीमध्ये आणण्याची जबाबदारी चंद्रशेखर राव यांनी त्यांची मुलगी आणि एका अन्य निकटवर्तीय आमदारावर सोपविली. मात्र आता भालके प्रवेश न करताच मागे फिरले आहेत. भालके यांनी अद्याप राष्ट्रवादी सोडण्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र त्यांच्यासाठी राव यांनी लावलेली फिल्डिंग बघता आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.