BJP Election Chiefs : पवारांच्या बालेकिल्ल्यासाठी राहुल कुल तर; पुण्यासाठी मोहोळ मैदानात

BJP Election Chiefs : पवारांच्या बालेकिल्ल्यासाठी राहुल कुल तर; पुण्यासाठी मोहोळ मैदानात

Maharashtra BJP Election 2024 :  एकीकडे शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बाकी असतानाच भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी भाजपकडून आज (दि. 8) रोजी रणशिंग फुंकण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 48 मतदार संघासाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. येत्या लोकसभेसाठी पुणे आणि पुणे जिल्ह्यावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

त्यात काही दिवसांपूर्वी भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. येथे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यातच आता भाजपकडून मिशन 2024 साठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या प्रभारींमध्ये पुण्याची जबाबदारी माजी महापौर आणि भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रभारी म्हणून जाबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यात मध्यावधीची चाहूल; विधानसभेसाठी भाजपच्या शिलेदारांची फौज तयार, नावे जाहीर!

पवारांच्या बारामतीत राहुल कुल लावणार सुरूंग

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती मतदार संघ काबीज करण्यासाठी कंबर कसली असून, या मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील भेट देत निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आगामी लोकसभेसाठी पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्यासाठी भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे आता पवारांचा बालेकिल्ला भाजपकडे कसा जाईल यासाठी कुल आता कशी सूत्रं फिरवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. या लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे आली आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

भाजपची 48 लोकसभा मतदारसंघात तयारी : निवडणूक प्रमुख नेमूनही टाकले

पवारांच्या शिलेदारासाठी लांडगे मैदानात

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे जाहीर केले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी अन् हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदार संघात येतो. २००९ पासून या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादीने ही जागा जिंकली. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे खासदार झाले. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी येथील मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे देण्यात आली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube