Download App

सतेज पाटील एकाकी पडलेत; काँग्रेस सोडणार ?

Satej Patil : तब्बल 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत.

  • Written By: Last Updated:

Satej Patil kolhapur politics : राज्याच्या काँग्रेसमध्ये (Congress) आता बोटावर मोजण्या इतकेच नेते शिल्लक राहिलेत. त्यातील एक नेता म्हणजे विधानपरिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील. (Satej Patil) पश्चिम महाराष्ट्रातील एकेकाळचा बलाढ्य नेता. या नेत्याला कोल्हापूरच्या राजकारणातील किंग म्हटलं जात. तब्बल 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत. स्वतः बंटी पाटील यांनी हे एका कार्यक्रमात जाहीर करून टाकलंय. बंटी पाटील हे एकाकी का पडलेत ? त्याचा कोल्हापूरच्या राजकारणावर काय परिणाम होईल ? विरोधकांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळत काय सल्ला दिलाय हेच या व्हिडिओतून पाहुया….

लोकसभा जिंकण्यातही बंटी पाटलांचा सिंहाचा वाटा
बंटी पाटील हे ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तो निवडून आलाच समजा, असे राजकीय समीकरण होते. गेल्या तीन लोकसभेला हे दिसून आले. 2014 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना बंटी पाटील यांनी मदत केली आणि ते निवडून आले. तर 2019 ला शिवसेनेचे संजय मंडलिक यांना बंटी पाटील यांनी मदत केली महाडिकांना पराभूत झटका दिला. तर 2024 ला मात्र ही जागा महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली. येथून शाहू छत्रपती महाराज हे सहज निवडून आले. या विजयात बंटी पाटील यांचाही सिंहाचा वाटा आहे. तब्बल अनेक वर्षानंतर कोल्हापूरात काँग्रेसचा खासदार झाला. त्यातून बंटी पाटलांची ताकद दिसून आली. (Satej Patil kolhapur politics )


कोल्हापूरच्या सर्व दहा जागा महायुतीला, बंटी पाटलांना मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कोल्हापूरमध्ये मोठा झटका बसला. कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीने सहज जिंकल्या. त्यात कोल्हापूरात भाजपला पहिल्यांदाच दोन आमदार निवडून आणता आले. त्यामुळे कोल्हापूरमधून काँग्रेस पार हद्दपार झाली. 2019 ला बंटी पाटलांनी बिकट परिस्थितीत काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले. परंतु या विधानसभेला त्यांना मोठा सेटबॅक बसला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते ऋतुराज पाटील यांना निवडून आणू शकले नाहीत. भाजपचे अमल महाडिक यांनी येथून विजय झाले. हा पराभव सतेज पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. तसे पाहिले तर सतेज पाटील यांची कोंडी विधानसभा निवडणुकीपासून झाली. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली. परंतु ती रद्द झाली. त्यानंतर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी मिळविण्यासाठी बंटी पाटील प्रयत्नशील होते. परंतु मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली. त्यामुळे बंटी पाटील प्रचंड चिडले. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांना रडूही कोसळले होते.


हसन मुश्रीफांनी साथ सोडली

अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची गोकुळमध्ये सत्ता होती. परंतु कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नविदची वर्णी लागलीय. हसन मुश्रीफ हे महायुतीबरोबर आहेत. त्यामुळे आगामी काळात हसन मुश्रीफ हे सतेज पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात मदत करणार नाहीत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत बंटी पाटील हे एकाकी पडले आहेत. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बंटी पाटील हे बिनविरोध विधानपरिषदेवर गेलेत. ही जागा दोन वर्षांनी रिक्त होणार आहे. महायुतीची ताकद बघता ते पुन्हा विधानपरिषदेवर जाण्याची वाट बिघट होणार आहे. त्यामुळेच बंटी पाटील यांनी मी एकाकी पडलोय, अशा भाषा वापरली असल्याचे बोलले जात आहे. त्यात जुने मित्र हसन मुश्रीफांनी बंटी पाटलांना एक सल्ला दिलाय. तो सल्ला आहे हार न मता लढाई करायचा.


धनंजय महाडिकांनी डिवचले

एकाकी पडल्याची भाषा वापरणाऱ्या बंटी पाटील यांना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांना डिवचले. तर स्वतःचे उदाहरण देण्यास ते विसरले नाहीत. 2019 च्या लोकसभेला माझा घात केला. विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता. गोकुळमधील आमची सत्ता गेली होती. विधान परिषद गेली. मात्र आम्ही कधी नाराज झालो नाही. लोकांची कामे करत राहिलो. पुन्हा खासदार झालो. पण आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही. किंवा गाव सोडून गेलो नाही, अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना डिवचलंय.

सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडल्याची भाषा वापरली असली तरी जनतेच्या पाठिंब्यावर वाटचाल करणार असे ते म्हणायला विसरले नाहीत. सतेज पाटील हे राजकारणातील मुरलेले नेते आहेत. ते सहजासहजी माघार घेणार नाहीत. परंतु त्यांना काँग्रेस पक्षाकडून साथ मिळाली पाहिजे, नाहीतर सतेज पाटलांसारखा नेता पक्षात घेण्यासाठी महायुतीतील पक्ष डोळा ठेवून असतीलच.

follow us