सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा (Congress) एबी फॉर्म मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंतही यश आलेले नाही. त्यामुळे त्यांना अपक्षच लढावे लागणार आहे. विशाल यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी काँग्रेस पक्षाशी नामसाधर्म्य असलेल्या भारतीय विकास काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पर्यायाचाही विचार केला होता. पण त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. (Vishal Patil from Sangli Lok Sabha constituency has not received AB form of Congress.)
दरम्यान, विशाल पाटील यांना काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. आज (19 एप्रिल) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी चंद्रहार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.
अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत म्हणाले, सांगली अत्यंत मजबुतीने पुढे जात आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडी 100 टक्के जिंकणार आहे. विशाल पाटील हेही आमच्याच कुटुंबातील आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पण असे अनेक ठिकाणी झाले आहे. अर्ज भरला म्हणजे बंडखोरी होत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेले आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू, असा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे.