नीलेश लंकेंच्या पाठीवर पवारांचा हात; शरद पवारांची तोफ आज नगरमध्ये धडाडणार

नीलेश लंकेंच्या पाठीवर पवारांचा हात; शरद पवारांची तोफ आज नगरमध्ये धडाडणार

Ahmednagar Lok Sabha : नगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आहेत. त्यांची टक्कर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्याशी होत आहे. विखेंचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसरीकडे लंके यांनीही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून थेट गावागावात जाऊन प्रचार केला आहे. आता ही जनसंवाद यात्रा नगरमध्ये येत असून आज येथेच सांगता होणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः नगरमध्ये येत आहेत. शहरातील गांधी मैदानात आज दुपारी चार वाजता शरद पवार सभेला संबोधित करणार आहेत.

सुजय विखे यांच्यासाठी जसे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरले आहेत. प्रचाराचं नियोजन करत आहेत. गावागावात फिल्डिंग लावत आहेत. नीलेश लंकेंनी ऐकलं नाही आणि आमदारकीचा राजीनामा दिला म्हणून अजितदादांचाही त्यांच्यावर राग आहे. अजितदादांचंही या निवडणुकीवर लक्ष आहेच. अशा राजकीय व्यूहरचनेत नीलेश लंकेंच्या पाठीवर शरद पवारांनी हात ठेवला आहे.

“विखेंविरोधात प्रचार हाच त्यांचा धर्म” शरद पवारांच्या नगर दौऱ्यावर मंत्री विखेंचा खोचक टोला

आज नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार नगरमध्ये येत आहेत. शरद पवार नगरमध्ये येण्याआधीच राधाकृष्ण विखेंनी त्यांना शाब्दिक चिमटा काढला होता. शरद पवार नगरमध्ये आले नसते तर एक आश्चर्यच झालं असतं. त्यामुळे ते येत आहेत यात काही नाविन्य नाही. विखेंविरोधात प्रचार करणं हा त्यांचा धर्मच आहे असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते. आता शरद पवार जाहीर सभेतून काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.            

अहदमनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता आज नगर शहरात होत आहे. यानिमित्त आज दुपारी ४ वाजता नगर शहरातील गांधी मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे नगरमध्ये येणार आहेत. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे.

Nilesh Lanke : लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ

निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा १ एप्रिलपासून पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून सुरु झाली होती. १९ दिवस चाललेली ही यात्रा पाथर्डी, शेवगाव, राहुरी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांनंतर आज नगर शहरात येत आहे. या यात्रेचा मुक्काम मंदिर तर कधी एखाद्या मंगल कार्यालयात सुरू होता. बुधवारपासून ही यात्रा नगर शहरात सुरु आहे. शहरातील विविध प्रभागात ही यात्रा जात असून ठिकठिकाणी चौक सभा घेतल्या जात आहेत. या यात्रेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टीसह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

शुक्रवारी होणाऱ्या सांगता सभेसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube