बीडमधील प्रशासन, पोलीस यंत्रणा ही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी किती पोखरलीय, याची रोज नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांच्या काळ्या कृत्यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेली गुन्हेदारी, वाल्मिक कराडच्या आदेशावर सगळे नियम धाब्यावर बसवून अवघ्या तीन दिवसात अगदी दारूच्या दुकानाचे मिळणारे परवाने, वाल्मिक कराडच्या चौकशी पथकातच त्याच्याशी संबंधित असलेले पोलीस, त्या पोलीसांबाबतचे फोटो अशा गोष्टी यापूर्वी समोर आल्या आहेत. (Who is Sunny Athavle who exposed Valmik Karad-Sitalkumar Ballal?)
आता एका आरोपीला सोडण्यासाठी वाल्मिक कराड (Walmik Karad) थेट पोलीस निरीक्षकांनाच सूचना देत असल्याची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. सनी आठवले (Sunny Athavale) या बीडमधील नामचिन गुंडाला सोडवण्यासाठी वाल्मिक कराड बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना सूचना देत असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला जात आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल होताच पोलीस अधिक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
बीडमधील नामचिन गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे. खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्यात तो सध्या फरार आहे. आठवलेची राजकीय लोकांशीही उठबस आहे. आठवले आधी वाल्मिक कराडसोबतच काम करत होता. तो दिपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्षही आहे. याच ग्रुपच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्याशीही जवळीक वाढली. स्थानिक राजकारणात त्याचे योगेश क्षीरसागर यांच्याशी पटत नसल्याने तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला.
आठवलेची सोशल मिडिया अकाऊंट्स पाहिल्यास एखाद्या सेलिब्रेटीचे अकाऊंट वाटते. तो फेसबुकवर स्वतःला कंटेट क्रिएटर समजतो. त्याचे जवळपास 14 हजार फॉलोअर्स आहेत. कधी दादागिरी करतानाचे व्हिडीओ, तर कधी जेलमधील फोटो तो अपलोड करत असतो. आपली ताकद दाखविण्यासाठी तो राजकीय नेत्यांसोबतचे फोटो नित्यनियमाने अपलोड करत असतो. किंग ऑफ बीड सिटी, सनी भैय्या, बीड जिल्ह्याचे आदरणीय वडील, अशा पोस्ट तरुण मुलांच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला दिसून येतात. गुरूपौर्णिमेला 18-20 वर्षीची मुले गुरू म्हणून त्याच्यासोबतचे फोटो व्हायरल करतात.
अशा या सनीने आता एक फेसबुक पोस्ट करून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा दावा केला आहे. वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांची ही क्लिप व्हायरल होत आहे. शितलकुमार बल्लाळ हे वाल्मीक अण्णा कराड यांचे मित्र आहेत. काही कारणास्तव मी वाल्मिक अण्णा कराड यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत तीन ते चार वेळेस आढळून आलो. त्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आला आणि सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना दिले होते.
त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावले होते. मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलविण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही. तो राग मनामधे धरत व अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले आहे. दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षिरसागर हा माझा मित्र आहे परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही. वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत.
माझ्यावर बनावट नोटा छापाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मीकांना कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला. मी आमदारांचे काम करत आहे. माझं चुकलं, मला माफ करा असे बोलल्यानंतर लागलीच वाल्मीक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना फोन करून “त्या सनीला नका गुतवू संशयितमध्ये झाली, त्याची चूक झाली ते माफी मागायला लागलंय, जावुद्या, द्या विषय सोडून. तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश आणि त्याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे” अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल करत आहे, असेही सनी आठवले याने म्हंटले आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत. सदर क्लिप खोटी आहे. आवाज अगदी माझ्यासारखाच असला तरी संबंधित ऑडिओ क्लिप बनावट आणि फेक आहे. क्लिपमधील संवाद माझा नाही. एआय वापरून संबंधित ऑडिओ क्लिप बनवली आहे. सनी आठवले हा फरार गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. बाहेर राहून अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. रंतु अशा फोन रेकॉर्डिंगचा काहीही फायदा होणार नाही. तो माझा आवाज नाहीच. याप्रकरणी मी सायबर अॅक्टखाली गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले आहेत. पण एकूणच या सगळ्या प्रकरणातून बीडमधील सगळीच प्रशासकीय यंत्रणा वरपासून खालपर्यंत किती आतपर्यंत पोखरली गेलीय याचा अंदाज येऊ शकतो.