Download App

“दिल्लीतील साहित्य संमेलन दलालांचे”, राऊतांच्या आरोपांवर संजय नहारांचं मुद्देसूद उत्तर

खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रत्युत्तर दिले.

Marathi Sahitya Sammelan 2025 in Delhi : राजधानी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. काल या संमेलनात शरद पवार आणि एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने शिंदेंचा सन्मान करण्यात आला. परंतु, हा सन्मान ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला. खासदार संजय राऊत यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि थेट शरद पवार यांच्यावरच टीका केली. इतकेच नाही तर दिल्लीतील संमेलन दलालांचे असल्याचा आरोप केला. या गंभीर आरोपांवर आता साहित्य संमेलनाचे आयोजक आणि सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी बाजू मांडली आहे.

काय म्हणाले संजय नहार ?

नहार म्हणाले, एकनाथ शिंदे हे महादजी शिंदे यांच्या साताऱ्याच्या भूमीतून आले आहेत. शिंदे यांनी काश्मीर आणि पंजाब या राज्यांत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी मदत केली. त्यांनी कामे केली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नावाचा पुरस्कारासाठी आम्ही निर्णय घेतला. साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे. साहित्य संमेलन घेण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या संस्थेला परवानगी दिली जात असते. यंदा सरहद संस्थेने हे संमेलन आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सत्कार करणे ही आधीपासून चालत आलेली आहे.

राज्यात काहीही झालं तरी दिल्लीत मात्र महाराष्ट्र एक असतो. आपण आपसांत कितीही वाद केले तरी दिल्लीच्या व्यासपीठावर मात्र सर्वांनी एकत्र दिसणे गरजेचे आहे. याआधीही साहित्य संमेलनावर टीका झालेली आहे. संजय राऊत आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनाही आम्ही संमेलनाचे निमंत्रण दिले आहे, असे संजय नहार (Sanjay Nahar) यांनी स्पष्ट केले.

“गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का, दिल्लीतील संमेलन दलालांचे” पवारांची गुगली राऊतांना झोंबली

काय म्हणाले होते राऊत ?

एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे. प  ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली.

शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत  यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतच धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी जोरदार टीका केली.

भ्रष्ट सरकारच्या बाजूने… भ्रष्टाचाराचे स्फोट अन् राळेगणचं दैवत; संजय राऊत अण्णा हजारेंना काय म्हणाले?

follow us