Download App

महसूल, जलसंपदा अन् ग्रामविकाससाठी रस्सीखेच; मंत्र्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी

कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे.

Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपाची चर्चा सुरू झाली आहे. ३९ आमदारांना मंत्रि‍पदाची शपथ घेतली. आता त्यांना कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे. यातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील २०१४ मधील सरकारमध्ये किंवा त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या काही जणांनी पूर्वीची खाती मिळण्याची शक्यता धुसर आहे. तसेच महसूल, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा आणि गृहनिर्माण या पाच खात्यांसाठी दावेदार वाढले आहेत.

DCM शिंदेंना गृहमंत्रालय मिळण्याची शक्यता धूसर, गृहखात्यासह नगरविकास खातेही भाजपकडे जाणार

हिवाळी अधिवेशन कालपासून नागपुरात सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या एक दिवस आधी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार आहे. येत्या दोन दिवसांत खातेवाटप होण्याची शक्यता आहे. कोणतं खातंं कुणाला मिळणार याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी कोणतं खातं कुणाला द्यायचं याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाल्याचे दिसते.

दुसरीकडे मंत्र्यांकडूनही मनपसंत खाते मिळण्यासाठी दबाव वाढविला जात आहे. यातच पुन्हा मंत्री झालेल्या आमदारांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये जी खाती त्यांच्याकडे होती तीच खाती पुन्हा मिळावीत असे वाटत आहे. परंतु, मंत्रिमंडळात झालेला बदल आणि नव्या चेहऱ्यांची एन्ट्री पाहता या मंत्र्यांना त्यांची जुनी खाती पुन्हा मिळतील याची शक्यता कमीच दिसत आहे.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजा मुंडे यांच्याकडे महिला व बालविकास खात्याची जबाबदारी होती. परंतु आता हा विभाग अजित पवार गटाकडे आहे. शिंदे यांच्या सरकारमध्ये अदिती तटकरे या खात्याच्या मंत्री होत्या. त्यामुळे आता हे खाते पुन्हा तटकरे यांनाच मिळेल अशी दाट शक्यता आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ग्रामविकास खात भाजपकडे होते. गिरीश महाजन या खात्याचे मंत्री होते. यावेळी हे खाते एकतर महाजन किंवा मग पंकजा मुंडे यांना मिळू शकते. जर असे काही होणार असेल तर गिरीश महाजन यांना जलसंपदा किंवा ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना तर अर्थ खाते अजित पवार यांच्याकडेच राहिल. महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळू शकते. आधीच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील या खात्याचे मंत्री होते.

शपथविधीच्या तोंडावर शिंदेंना धक्का! मंत्रिपद न मिळाल्याने आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

या पाच खात्यांसाठी सात दावेदार

दरम्यान, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा आणि गृहनिर्माण या खात्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, अतुल सावे प्रमुख दावेदार आहेत. या सात पैकी पाच जणांना खाती मिळतील. उर्वरित दोघांना यापेक्षा कमी महत्वाची खाती मिळू शकतील. शिंदे सेनेत भरत गोगावले पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. त्यांना परिवहन खाते मिळण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांना शालेय शिक्षण वा सार्वजनिक आरोग्य खाती दिली जाऊ शकतात. तर शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क खाते कायम राहू शकते.

 

follow us