Download App

Air Pollution : प्रदूषण रोखण्याच्या ‘मुंबई पॅटर्न’वर नेटकऱ्यांचा संताप, बौद्धिक दिवाळखोरी म्हणत केलं ट्रोल…

Air Pollution : दिल्ली, मुंबईसह अन्य महानगरांतील प्रदूषण (Air Pollution) प्रचंड वाढलं आहे. या विषारी हवेत श्वास घेणच कठीण झालं आहे. त्यामुळे वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी विविध प्रयोग करण्याचं प्रशासनानं ठरवलं आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने सुरू केलेला अफलातून प्रयोग मात्र टीकेचा धनी ठरला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या प्रयोगावर (Mumbai Pollution) प्रचंड टीका करत संताप व्यक्त केला आहे. खरं तर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या सर्व वाहनांची चाके धुतली जाणार आहेत. तसेच धुळीचा त्रास कमी व्हावा यासाठी रोज किमान 650 किलोमीटर रस्ते धुतले जाणार आहेत. याच प्रयोगावरून नेटकऱ्यांनी प्रशासनाला प्रचंड ट्रोल केले आहे.

Mumbai News : ऑलिम्पिक दर्जाच्या स्विमिंग पूलमध्ये चक्क मगर; कर्मचाऱ्यांची सतर्कता आली कामी

माजी आयएएस अधिकारी महेश झगडे यांनीही पालिकेच्या या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत पालिका प्रशासनाला फटकारले आहे. ‘प्रशासनाच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव करावी तितकी कमीच! आपण दिवाळी साजरी करतोय, बौद्धिक दिवाळखोरी नव्हे!! भान असू द्या!!!’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या पोस्टवर अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. Velasa D या नावाच्या ट्विटर युजरने अक्कल वापरायचीच नाही असा निर्धार केला की काय, कोणती परीक्षा देऊन ही मंडळी उत्तीर्ण होतात अशा शब्दात मुंबई पालिकेला ट्रोल केले. एका जणाने ही दिवाळखोरी नसून पैसे कमविण्यासाठी केलेली आयडीयाची कल्पना आहे, असे म्हटले आहे.

नेमका काय आहे प्रयोग ?

बाहेरच्या शहरांतून मुंबईत येणाऱ्या वाहनांची चाके धुण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व एन्ट्री पॉइंट्सवर वॉटर जेट स्प्रे मशीन बसवण्यात येणार आहे. वाहने शहरात प्रवेश करण्याआधी पाण्याचा मारा करून चाके धुतली जातील. यासाठी वाहन थांबविण्याची गरज नाही. चालत्या वाहनांच्या चाकांवर पाणी फवारले जाईल. तसेच धूळ कमी करण्यासाठी दररोज 650 किलोमीटर रस्ते धुण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, देशाची राजधानी दिल्ली शहरात प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. या शहरात श्वास घेणंही कठीण झालं आहे. वाढलेलं प्रदूषण लक्षात घेता दिल्ली प्रशासनाने शहरात ऑड इव्हन फॉर्म्युला लागू केला आहे.  तसेच येथील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. तशीच परिस्थिती मुंबई शहरात होत आहे. शहरातील वाढलेल्या प्रदूषणावर न्यायालयानेही प्रशासनाला फटकारले आहे. त्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीन काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Tags

follow us