Devendra Fadnavis : राज्यात आणि विशेष करुन मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 29 जून रोजी एका व्यावसायिकाला मराठी भाषेचा अपमान केला म्हणून मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यानंतर मीरा भाईंदर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचे पडसाज राजकीय वर्तुळातही उमटले. अशा प्रकारे मारहाण करणं अतिशय चुकीचं आहे. गुंडगिरीवर कारवाईच करू असा रोखठोक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिला.
मीरा भाईंदर येथे व्यापाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता फडणवीस म्हणाले, भाषेवरून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.
आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यांत राहतात. व्यवसाय करतात. त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का. भारतात अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही योग्य नाही. अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा रोखठोक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
Video : शरद पवारही ‘जय कर्नाटक’ म्हणाले होते; शिंदेंची पाठराखण करताना फडणवीसांचा दाखला
मीरा भाईंदर येथील व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर गु्न्हा दाखल झाला आहे. एखादा मराठी व्यापारी आसाममध्ये जाऊन तेथील भाषा शिकायला त्याला वेळ लागत असेल तर मग त्यालाही अशीच मारहाण होणार का असा सवाल त्यांनी विचारला. जर मराठी भाषेचा खरंच इतका अभिमान असेल तर मराठी भाषा शिकवा, क्लास घ्या. स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकायचं आणि मराठीसाठी गळे काढायचे अशी टीका फडणवीसांनी ठाकरे बंधुंवर केली.
यापूर्वी एकदा चिकोडी येथे बोलताना, शरद पवार यांनी जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक असं म्हटलं होतं. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं समजायचं का? असं आहे, आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं, म्हणजे एकनाथ शिंदे यांचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि मराठीवरचं प्रेम कमी झालं, महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं, इतका संकुचित विचार मराठी मणसाला शोभत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.