Download App

भाजपच्या ‘वॉर रुम’मध्येच अंतर्गत वॉर! ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओमागे दोन नेत्यांमधील भांडणं?

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाला.  या घडामोडीतच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी “मी पुन्हा येईन”, अशा आशयाचा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला. मात्र काही वेळातच हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. (Devendra Fadnavis’s video tweeting is due to the internal war in BJP’s war room)

या संपूर्ण प्रकारावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कमबॅक करणार असल्याच्या चर्चा समाजमाध्यम आणि वृत्तवाहिन्यामध्ये सुरु झाल्या. भाजपकडून स्पष्टीकरण देत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. व्हिडिओ डिलीट केल्यानंतर घडलेल्या प्रकाराला जास्त प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, या संपूर्ण घोळात हा व्हिडीओ आता ट्विट करण्यामागे भाजपच्या वॉर रुममधीलच अंतर्गत वॉर कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. वॉर रूम चे ‘बिग बॉस’ आणि आय टी मधील महिला ‘बिग बॉस’ यांच्यात संघर्ष उफाळून आला आहे. याच वादातून निर्माण झालेल्या विसंवादामुळे हा व्हिडीओ ट्विट झाल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Raut : ‘फडणवीस पुन्हा येत असतील तर स्वागतच करू’; राऊतांचा खोचक टोला

भाजपच्या ‘वॉर रुम’ मध्येच अंतर्गत वॉर!

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या राज्याच्या वॉररुममध्ये वॉर सुरू असल्याच्या चर्चा प्रदेश कार्यालयात दबक्या आवाजात सुरु आहेत. भाजपमधील काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर रूमचे ‘बिग बॉस’ आणि आयटी विभागाच्या महिला ‘बिग बॉस’ यांच्यात संघर्ष उफाळून आला आहे. एका गटाने सूचना केली की त्या सुचनेला फाट्यावर मारण्यासाठी दुसरा गट तयार असतो. एकाने एक क्रिएटिव्ह तयार केले की दुसरा त्यापेक्षाही सरस आणि स्फोटक करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीने वरिष्ठ नेत्यांसमोर वरचढ ठरण्याची स्पर्धा सुरु झाल्याची माहिती आहे.

“मी पुन्हा येईन” हा व्हिडीओ खरंतर फॅनपेजसाठी तयार केला होता. पण तो फॅनपेजसह भाजपच्या एक्सवर टाकण्यासाठी देखील मंजुरी दिली गेली. ही चूक काहींना लक्षात आली, पण ती थांबवण्यात आली नाही. याच पद्धतीची चूक आणि घटना जयंत पाटील यांच्या व्हिडिओ बाबतीत देखील घडली होती. “जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची दहा कारणे” या आशयाचा व्हिडिओ भाजपच्या सर्व सोशल मिडीयाच्या मुख्यपेजवरुन पब्लिश झाला होता. यावर कमालीच्या नकारात्मक कमेंट आल्या. खरंतर हा व्हिडीओ देखील फॅनपेजवर अपलोड होणे अपेक्षित होते पण उलटेच झाले.

Rohit Pawar : पुन्हा येण्याच्या मोहापायी…’बॉम्बे डायमंड बुर्स’ स्थलांतरावरून सुळेंनंतर रोहित पवारांचंही टीकास्त्र

या प्रकारानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडिया सेलची प्रचंड झाडाझडती घेतली होती. त्यानंतर देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर सादरीकरण कोण करणार यावरुनही या दोन्ही ‘बिग बॉस’मध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. आता पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईन’ या व्हिडीओवरुन झालेल्या घोळामुळे ही स्पर्धा किती टोकाला गेली आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. आता यापुढील काळात ही स्पर्धा आणखी किती रंगत जाणार? भाजप वॉर रूमचा वार कोणाला सहन करावा लागणार? याबाबत भाजप पक्ष कार्यालयात दबक्या आवाजात चर्चा आहे.

Tags

follow us