मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यात आता खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांचीही भर पडली आहे. खासदार देसाईंचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने (ED) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयने (CBI) तीन आठवड्यांपूर्वी बोभाटे यांच्याविरोधात बेहिशोबी संपत्तीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोभाटे यांच्यावर उत्पन्नापेक्षा दोन कोटी 60 लाख रपयांची अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे मागवून ईडीने तपास सुरु केला होता. त्यानंतर आता बोभाटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ED has registered a money laundering case against MP Anil Desai’s private secretary Dinesh Bobhate.)
ईडीने या गुन्ह्यात म्हटंले आहे की, बोभाटे जरी खासगी सचिव असले तरी ते एका विमा कंपनीतही पदावर आहेत. त्यांच्या इथल्या उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे दोन कोटी साठ लाखांची अधिकची संपत्ती आढळून आली आहे. त्यानंतर ईडीने आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे पैसे कुठून आले, कसे आले, या उत्पन्नाचा स्त्रोत काय? याबाबत त्यांची चौकशी होणार आहे. याशिवाय या पैशांचा खासदार देसाई यांच्याशी काही संबंध आहे का? याची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. खासदार संजय राऊत यांना यापूर्वी ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकही केली होती. सध्या या प्रकरणात ते जामीनावर बाहेर असून त्यांची चौकशीही सुरु आहे. तर आमदार रविंद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी झाली आहे. त्यानंतर आता खासदार अनिल देसाई यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.