Download App

‘गाडीखाली कुत्रं आलं तरी राजीनामा मागतील’; घोसाळकर प्रकरणी फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis reaction on Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येच्या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती देत दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेवर विरोधकांनी सरकारवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घडामोडींनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. उद्या एखादं श्वान गाडीखाली आलं तरी राजीनामा मागतील, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिषेक घोसाळकर प्रकरणात विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले.

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: मुंबई गुन्हे शाखा करणार खूनाचा उलगडा

अभिषेक घोसाळकर यांच्याबाबतीत काल घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीनं निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे. एकूणच या प्रकरणाला काही लोकं राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील योग्य नाही. ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी 2024 मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील, अभिषेक घोसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स पहायला मिळालेले आहेत. वर्षानुवर्षे ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आता कोणत्या विषयावरून त्यांच्यात इतका बेबनाव झाला की मॉरिसने थेट गोळ्याच घातल्या आणि स्वतःलाही गोळ्या घातल्या. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील. जी कारणे लक्षात येत आहेत ती वेगवेगळी आहेत. ती एकदा कंफर्म झाली की त्याची माहिती दिली जाईल. माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की घटना गंभीर आहे त्यामुळे या घटनेचे राजकारण करता कामा नये. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था संपली अशी विधानं करणं हे चुकीचं आहे.

राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीस राजीनामा द्या; घोसाळकर गोळीबारानंतर राऊतांचे टीकास्त्र

वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली ही घटना आहे. यासंदर्भात बंदूका असतील, परवाने असतील, ते योग्य होते की नाही, परवाना नसेल तर बंदूक आली कुठून किंवा परवाने देताना आणखी काही खबरदारी घेतली पाहिजे का याचा विचार राज्य सरकार करील.

हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की ही घटना गंभीरच आहे. पण, अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील. या गंभीर घटनेकरता त्यांनी राजीनामा मागितला तर यात मला काही आश्चर्य वाटत नाही. मला असं वाटतं की या घटनेचं राजकारण त्यांना करायचं आहे. त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी घटना घडली आहे ती वैयक्तिक वैमनस्यातून घडली आहे तरी देखील विरोधी पक्ष त्यांचं काम करतोय करू द्या.

follow us