Download App

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १४ मृत्यू, ७४ जखमींना वाचवले

घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ लोकांना वाचविण्यात आले आहे.

Ghatkopar Hoarding Collapse : काल दुपारी अचानक मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ लोकांना वाचविण्यात आले आहे अशी माहिती एनडीआरएफने दिली. दरम्यान, राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होर्डिंगखाली दबलेल्या आठ जणांचे मृतदेह आधीच बाहेर काढण्यात आले होते. तरी देखील अजूनही काही मृतदेह या ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल घाटकोपर परिसरात तुफान पाऊस झाला. जोरदार वारे सुटले होते. या वाऱ्याचे वेगाने येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळला. मुंबईत काल दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बऱ्याच लोकांनी या पेट्रोल पंपावर थांबा घेतला होता. परंतु, त्याचवेळी येथील एक मोठे होर्डिंग थेट पेट्रोल पंपावर कोसळले. या होर्डिंगखाली ८० वाहने अडकली. या घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. ज्वलनशील पदार्थ असल्याने गॅस कटर वापरता येत नव्हते. त्यामुळे होर्डिंग हटवून लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू! अजूनही लोक अडकले

या पथकाने बचावतकार्याला सुरुवात केली. काल रात्रभर हे काम सुरू होते. एनडीआरएफने दिलेल्या ताज्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. जखमी लोकांवर रुग्णाालयात उपचार सुरू आहेत. काही जणांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात ४३ लोकांवर उपचार सुरू आहेत.

पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या दुर्घटनेप्रकरणी शहरातील पंतनगर पोलीस ठाण्यात जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या जागेत हा अनधिकृत होर्डिंग लावण्यात आला होता. या परिसरात आणखीही काही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग आहेत त्यावर महापालिकेने कारवाईस सुरुवात केली आहे.

Weather Update : अवकाळीचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जखमींचा उपचाराचा खर्च सरकार देणार आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही अधिक तपास करण्यात येत आहे.

follow us