Railway Minister Ashwini Vaishnav : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्यात एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी काही प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली. बैठकीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
गोंदिया ते बल्लारशहा या 240 किलोमीटर दुहेरी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 4 हजार 890 कोटींचा निधी दिला जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेसाठी एक नवीन मार्ग तयार झाला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे असे मंत्री वैष्णव म्हणाले.
मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकलचे काम सुरू करण्यात आले आहे. कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार आहे. आजमितीस महाराष्ट्रात रेल्वेची गुंतवणूक 1 लाख 73 हजार 804 कोटी इतकी झाली आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 23 हजार 778 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रासाठी फक्त 1171 कोटी रुपयांचे रेल्वे बजेट मिळत होते असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
गोंदिया बल्लारशाह रेल्वेमार्गाला मंजुरी. यासाठी 4 हजार 119 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. यातून विदर्भाला फायदा होणार आहे. छत्तीसगड आणि तेलंगणाबरोबरील व्यापार वाढण्यासाठी ही रेल्वे लाइन अत्यंत महत्वाची आहे. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केंद्र सरकार 1 लाख 73 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. तसेच राज्यातील 132 रेल्वे स्टेशन्स केंद्र सरकारने पुनर्विकासासाठी घेतले आहेत. यावेळी 23 हजार 700 कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळाले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील ऐतिहासिक किल्ले आणि अन्य सांस्कृतिक स्थळे नागरिकांना पाहता यावीत यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एक खास योजना आखली आहे. राज्यात लवकरच एक सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यांसह रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी आणखी कोणते प्रकल्प मंजूर केले आहेत याची माहिती फडणवीस यांनीही दिली.