Download App

Maratha Reservation : मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचाही राजीनामा

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. आरक्षणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं आहे. या आयोगाकडून आरक्षणाच्या दृष्टीने काही महत्वाची माहिती मिळेल असे वाटत असतानाच आयोगाच्या अध्यक्षांच्याच राजीनाम्याची बातमी धडकली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे. निरगुडे यांच्या आधी आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. आयोगाच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप होत असल्याचा आरोप या सदस्यांनी केला होता. त्यानंतर आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेही राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर ही चर्चा खरी असल्याचे सिद्ध झाले आहे.

मराठा आरक्षणाच्या आशा पुन्हा मावळल्या? राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटिशनवर सुनावणी प्रलंबित असतानाच राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पिटिशनला मदत करील अशी माहिती आयोगाकडून मिळावी असे राज्य सरकारला अपेक्षित होते. मात्र, दोन मंत्र्यांचा आयोगाच्या कामात हस्तक्षेप होत असल्याचा आणि राज्य सरकारला पाहिजे तसाच डेटा आयोगाने तयार करून द्यावा यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत होता.

तीन सदस्यांचा राजीनामा 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र सर्वेक्षण सुरु होण्यापूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता दिसून आली. केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करुन अहवाल द्यावा अशी मागणी सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.

पण मर्यादित सर्वेक्षणाऐवजी अन्य समाजांचेही सर्वेक्षण करुन त्यातून मराठा समाज मागास आहे, असे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत आयोगातील सदस्यांचे आहे. याच मतभिन्नतेमुळे आधी प्रा. डॉ. संजीव सोनावणे आणि बालाजी किल्लारीकर या दोन सदस्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर अध्यक्ष निरगुडे हे स्वतःही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्याची बातमी आल्याने या चर्चा खऱ्या होत्या हेच आता सिद्ध झालं आहे.

राज्य मागासवर्ग आयोगातही मतभेद? भर सभेत सदस्याने राजीनामा दिला

 

follow us