गळ्यात किलोभर सोने, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी अन् शर्यत जिंकल्यावर गाडीच्या टपावर बसून मिरवणूक… असे वर्णन केले की डोळ्यासमोर यायचा तो सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadke) यांचा चेहरा. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, गोल्डनमॅन अशी पंढरीशेठ यांची ओळख. आज याच पंढरीशेठ फडके यांची प्राणज्योत मालवली आहे. दुपारच्या सुमारास घरी जाताना गाडीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फडके यांच्या निधनाने बैलगाडा चालक-मालक आणि बैलगाडा शर्यतप्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
पण महाराष्ट्रात इतरही बैलगाडा मालक असताना पंढरीशेठ फडके यांनाच इतकी प्रसिद्धी मिळण्याचे नेमके कारण काय होते? नेमके कोण होते ते? आणि काय करत होते?
नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटले की पंढरीशेठ फडके यांचे नाव आपोआप पुढे येते. खरंतर त्यांना हा वारसा आणि आवड ही पिढीजातच मिळाली. त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या घरात बैलगाडा शर्यतीचा शौक केला जात होता. सुरुवातीला शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. त्यानंतर पंढरीशेठ यांनी याच क्षेत्रात आपले नाव कमावले. हळूहळू त्यांच्याकडे पैसा यायला लागल्यावर त्यांनी महाराष्ट्रभर ज्या बैलगाडा शर्यती होतात त्यातील जिंकणाऱ्या बैलांना विकत घेऊन सांभाळण्याचे काम हाती घेतले.
अशाच एका शर्यतीदरम्यान फडके यांना बादल बैल मिळाला. बादलने पंढरीशेठ यांचे आयुष्यच बदलून टाकले. बादलने त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली. ज्या पंढरीशेठ यांना शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळालयचा त्यांना बादलने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकवून दिली होती. याशिवाय राज्यभरात त्यांच्या इतर बैलांनीही मोठी बक्षीसे जिंकली होती. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर फडके यांचे ‘बिनजोड छकडेवाला’ हे गाणे प्रचंड व्हायरल झाले होते. फडके यांना ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अशा महागड्या गाड्यांचाही जोरदार शौक होता. त्यांच्याकडील प्रत्येक गाडीचा नंबर 1010 असा असायचा. कोणतीही बैलगाडा शर्यत जिंकल्यानंतर गाडीच्या टपावर बसून आनंदोत्सव साजरा करण्याची आणि डान्स करण्याची फडके यांची शैली तरुणाईमध्ये बरीच लोकप्रिय होती.
बैलगाडाशिवाय फडके रियल इस्टेट व्यावसायिक होते. तसेच ते काही वर्षांपूर्वीपर्यंत सक्रिय राजकारणातही होते. ते आधी शेकाप आणि नंतर भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होते. पक्षीय राजकारणापासून दूर झाल्यानंतरही ते कल्याण-डोंबिवलीचे राजकारणात सक्रिय होते. याच वादातून त्यांनी कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. यात त्यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना तब्बल आठ महिने तरुंगवास भोगावा लागला होता. बाहेर आल्यानंतर फडके पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीमध्य्ये सक्रिय झाले होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.