अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून, निवडणूक आयोगाला दिला गर्भित इशारा
या मोर्चामध्ये पायी चालत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई सुरू झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा असलेल्या ठाकरे बंधूंमध्ये जिव्हाळा वाढल्यानंतर (Mumbai) आज पहिल्यांदाच दोन्ही भाऊ मोर्चात एकत्र उतरल्याने राजकीय वर्तुळाचे सुद्धा लक्ष लागून राहिलं होतं. महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट सत्याचा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये पायी चालत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई आता मनसेसह महाविकास आघाडीने सुरू केली आहे. जोपर्यंत मतदारयादीमधील घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका अशी एकमुखी मागणी महाविकास आघाडीसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा घेतली आहे.
MNS MVA Satyacha Morcha : मतचोरीबाबत विरोधकांची वज्रमूठ; सत्याचा विराट मोर्चात बडे नेते
एका एका घरामध्ये शेकडो मतदार दिसून आले आहेत, अनेक बोगस मतदार सुद्धा असल्याने हे बोगस मतदार कमी करावेत, दुबार नावे काढून टाकण्यात यावीत आणि मतदारयादी स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्यात अशी प्रमुख मागणी महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांनी घेतली आहे. मात्र, अजूनही निवडणूक आयोगाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबई ते दिल्ली असा दबाव वाढवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
मनसे आणि शिवसेनेमधील जवळीक वाढल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीत विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आजच्या मोर्चात प्रदेश काँग्रेसमधील नेते आणि मुंबई काँग्रेसमधील नेते सहभागी होणार की नाहीत? अशी चर्चा रंगली होती. मात्र, शेवटच्या क्षणी काँग्रेसचे नेतेही मोर्चात दिसून आले. मनसेला थेट विरोध करत असलेल्या भाई जगताप यांचाही मोर्चात सहभाग दिसून आला. बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेतेही सत्याचा मोर्चात चालताना दिसून आले.
