60 tourists from Mumbai missing : नेपाळमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या मुंबईतील सुमारे 60 पर्यटकांबाबत अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. नेपाळ-चीन सीमेवर आलेल्या महापूर आणि भूस्खलनामुळे हे पर्यटक चिखल, माती आणि डोंगराच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंधेरीतील डॉक्टर मिलिंद चितळे यांच्या हिल अँड ट्रॅकिंग कंपनीच्या माध्यमातून हे 60 पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक नेपाळ-चीन सीमेवरील कस्टम आणि इमिग्रेशन इमारतीजवळ पोहोचले होते. त्याचवेळी परिसरात महापूर आणि मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने डोंगराचा मोठा भाग, चिखल, माती आणि दगडांचा प्रचंड ढिगारा संबंधित इमारतीवर कोसळला.
या दुर्घटनेत इमारत पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबली असून, त्यावेळी परिसरात असलेले पर्यटकही जवळपास 40 ते 50 फूट खोल ढिगाऱ्याखाली दबले गेले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, घटनास्थळी प्रत्यक्ष पोहोचणे शक्य होत नसल्याने या पर्यटकांच्या स्थितीबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. या दुर्घटनेनंतर बचाव आणि शोधकार्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नेपाळ सरकारकडून पर्यटकांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, नेपाळ-चीन सीमेकडे जाणाऱ्या सुमारे 90 किलोमीटरच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल, माती आणि दगडांचा ढिगारा साचला आहे.
‘दोन टर्मच्या आमदाराला सरोगसीचा अर्थ माहिती आहे का?’ अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं
त्यामुळे जमिनीमार्गे घटनास्थळी पोहोचणे अशक्यप्राय झाले आहे. संबंधित इमारतीच्या परिसरात केवळ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोधमोहीम राबवता येऊ शकते. मात्र, इमारतीवर कोसळलेला ढिगारा अत्यंत मोठा असल्याने तो तातडीने बाजूला करून त्याखाली शोध घेणेही कठीण असल्याचे नेपाळ सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याच्या मोहिमेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नेपाळ सरकारने संबंधित भारतीय पर्यटकांच्या कुटुंबीयांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितल्याची माहिती आहे.
तसेच भारतातील स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित पर्यटक बेपत्ता असल्याच्या तक्रारी नोंदवण्याच्या सूचना भारतीय दूतावासाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळ सरकारकडून ही माहिती मिळाल्यानंतर बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेपाळ-चीन सीमेवरील इमिग्रेशन आणि कस्टम कार्यालयाच्या इमारतीवर डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने संपूर्ण परिसर चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला असून, हे पर्यटक 40 ते 50 फूट खोल ढिगाऱ्याखाली दबले गेले असावेत, अशी प्राथमिक भीती व्यक्त केली जात आहे.
जरांगेंचे आंदोलन सर्वपक्षीय मराठ्यांचे कुंभाड; भाजपचे मंत्री विखेही…गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
मात्र, शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत त्यांच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नेपाळमधील महापूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मदत कक्षही सक्रिय झाला आहे. शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली काठमांडू येथे गेल्या पाच दिवसांपासून मदत कक्षाच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून नेपाळमध्ये अडकलेल्या 11 विद्यार्थ्यांना सुखरूप पुण्यात आणण्यात आले आहे, तर कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 37 भाविकांनाही सुरक्षितपणे मुंबईत पोहोचवण्यात आले आहे.
याशिवाय नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील आणखी सुमारे 140 भाविकांशी संपर्क झाला असून, त्यांना लवकरच मुंबईकडे रवाना करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, बेपत्ता असलेल्या 60 पर्यटकांच्या शोधाकडे त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांचे लक्ष लागले असून, प्रतिकूल परिस्थिती, रस्त्यांवरील प्रचंड चिखल आणि भूस्खलनाचा ढिगारा यामुळे शोधकार्य अत्यंत कठीण बनले आहे. अधिकृत शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतरच या पर्यटकांच्या स्थितीबाबत स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
