दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाची धुळधाण करत भाजपने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) दणदणीत विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 70 पैकी तब्बल 46 जागा जिंकताना दिसत आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला अवघ्या 24 जागांवर यश मिळताना दिसत आहे. (BJP has won a resounding victory in the Delhi Assembly elections with 46 seats.)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांसाठी बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान पार पडले होते. त्यानंतर हाती आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये 37 ते 40 जागांसह भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एक्झिट पोलच्या आकड्यांवर आमचा विश्वास नाही. दिल्लीत आम आदमी पक्षच सरकार स्थापन करणार असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निकालात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
यापूर्वी 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली म्हणजे ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. परंतु, यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. देशभरातील भाजपचे आमदार, खासदार, भाजपशासित राज्यांमधील मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधानही मैदानात उतरले होते. अशात आता निकालात भाजपने सरशी मारली आले आहे.
भाजपचे दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, दिल्लीच्या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवली होती. तर अरविंद केजरीवाल या मुद्द्यांपासून पळ काढत होते. दिल्लीतील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता. आम्ही दारू घोटाळ्याबद्दल बोलत होतो, आम्ही खराब रस्त्यांबाबत प्रश्न विचारत होतो. आम्ही साफ-सफाई, अशुद्ध पाणी या मुद्द्यांवरून केजरीवाल यांना उत्तर मागितली होती. पण यातील एकाही मुद्द्यांवर केजरीवाल बोलले नाहीत.