पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र, पैसे परत घेणार का? तटकरेंनी केलं क्लिअर..

पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र, पैसे परत घेणार का? तटकरेंनी केलं क्लिअर..

Ladki Bahin Scheme : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेत चारचाकी वाहन असणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी राज्य सरकारने सुरू केली आहे. निकषात न बसणाऱ्या जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून त्यांचा लाभ आता बंद होणार आहे. तसेच अनेक महिला लाभार्थी स्वतःहून लाभ नाकारत आहेत. जिल्हा परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. या महिला स्वेच्छेने पैसे परत करत आहेत. पण ज्यांनी पैसे परत केलेले नाहीत त्यांच्या मनात आपण स्वतःहून पैसे दिले नाही तर सरकार पैसे वसूल करणार का असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे.

धक्कादायक! यूपी, बंगाली महिलांच्या खात्यात लाडकी बहीणचे पैसे; बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट

लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, विरोधकांकडून या योजनेवर टीका सुरू झाली. यामागे कारणही आहे. योजनेसाठी अर्ज करताना सरकारी यंत्रणांनी निकषांकडे लक्ष न देता सरसकट अर्ज मंजूर केले होते.

या योजनेच्या पात्रतेसाठी निकषांची चाळणी लावण्यात आली आहे. आदिती तटकरेंनी याची माहिती दिली. अपात्रतेच्या निकषांनुसार, संजय गांधी निराधार योजनेच्या 2,30,000 महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आलेय. याशिवाय, 65 वर्षांवरील 1,10,000 महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या.  कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1,60,000 अशा एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.

लाडकी बहीणसाठी सरकारचा आटापिटा; ‘या’ सरकारी योजना बंद होण्याच्या मार्गावर?

महिलांनी परत केलेले पैसे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी नवीन हेड तयार करण्यात आले आहे. ज्यांना या योजनेत लाभ नको असेल त्यांनी सरकारी बँकेत जाऊन या हेडच्या खात्यात चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिला या योजनेतून अपात्र ठरत आहेत. या अपात्र महिलांनी आता स्वेच्छेने पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.

अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही : तटकरे

परंतु, ज्या अपात्र महिलांनी पैसे परत केले नाहीत त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर मंत्री तटकरे यांनी दिलं आहे. आतापर्यंत लाभ घेतलेल्या महिलांकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. परंतु, अपात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यापासून पैसे जमा करण्यात येणार नाहीत असे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube