Priyanka Gandhi on Pahalgam Attack in Lok Sabha : सध्या लोकसभेचं पावसाळी (Lok Sabha) अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा सुरू आहे. आज गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेत भाग घेतला.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. मात्र, त्यांना मी सांगू इच्छिते की त्या हल्ल्यादरम्यान गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. जबाबदारी निश्चित झाली होती. पण, पुलवामा झाला, मणिपूर जळाला, पहलगाम झाला पण जबाबदारी कोणी घेतली? असा थेट प्रश्न प्रियंका गांधी यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी सरकारने सर्व सांगितलं, इतिहासही सांगितला, पण एक गोष्ट राहिली, पहलगाममध्ये हल्ला कसा झाला, तो का झाला? हा प्रश्न अजूनही सतावत आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. प्रियंका गांधींच्या या प्रश्नानंतर संपूर्ण सभागृह शांत झाल्याचं पाहायला मिळालं.
दहशतवादाचे मूळ पाकिस्तान अन् ही काँग्रेसची चूक, अमित शहांचा हल्लाबोल
प्रियांका गांधी यांनी शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा उल्लेख करून म्हटलं की, लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते. पण सरकारने त्यांना देवाच्या भरोशावर सोडले. हल्ल्याला कोण जबाबदार आहे? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांची नाही का, ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी केला. सरकारची अशी कोणतीही यंत्रणा नाही ज्याला असा भयानक हल्ला नियोजित असल्याची कल्पना आहे. हे एजन्सींचे अपयश आहे की नाही?, हे मोठे अपयश आहे, अशी टीका प्रियंका गांधींनी केली.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले. हे थांबवण्याची घोषणा आपल्या सरकार किंवा सैन्याने केली नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हे आपल्या पंतप्रधानांच्या बेजबाबदारपणाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. आज देशाला पोकळ भाषणे ऐकायची नाहीत, त्यांना सर्वकाही जाणून घ्यायचे आहे. 22 एप्रिल रोजी काय घडले हे जाणून घ्यायचे आहे, परंतु तुम्ही (सत्ताधारी पक्ष) स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहात, असं प्रियंका गांधींनी सांगितले.