काँग्रेसची खेळी की भाजपला धक्का! दिल्ली निवडणुकीत स्टार प्रचारकच गायब; ‘आप’ला फायदा?
Delhi Assembly Elections 2025 : राजधानी दिल्लीत निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपकडून जोरदार प्रचार केला (Delhi Assembly Elections 2025) जात आहे. दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या रॅली आणि सभा होत आहेत. पण देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस ज्या (Congress) पद्धतीने निवडणूक लढत आहे ते पाहून नक्कीच आश्चर्य होईल.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी, खासदार संजय सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उमेदवारांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. भाजपने सुद्धा पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अन्य नेत्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवल आहे. परंतु काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते प्रचारातून गायब आहेत.
निवडणूक प्रचाराच्या तोफा 3 फेब्रुवारीला सायंकाळी थंडावतील. त्यामुळे प्रचारासाठी आता फक्त एक आठवडा शिल्लक राहिला आहे. अशात आणखी वेगाने प्रचार करण्याची आवश्यकता आहे. पण काँग्रेस नेत्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज राजकीय जाणकारांना सुद्धा येईनासा झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी अजूनही प्रचारात फारसे दिसत नाहीत.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) काँग्रेसने आपबरोबर आघाडी करत निवडणूक लढली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र आपने आघाडी करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. इतकेच नाही तर इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना उबाठाने सुद्धा दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला.
आपच्या एन्ट्रीने काँग्रेस साफ, भाजपलाही धक्का; वाचा 3 CM बदलण्याचा किस्सा!
राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी सीलमपूरमध्ये प्रचार सभा घेतली होती. यानंतर दुसऱ्या रॅलीत मात्र राहुल गांधी येऊ शकले नाहीत. आजारी असल्याने प्रचाराला येऊ शकले नाहीत असे उत्तर काँग्रसने दिले होते. त्यावेळी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी राहुल गांधींचा संदेश लोकांना वाचून दाखवला होता.
राहुल गांधींची प्रकृती ठीक नसल्याने स्थानिक नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी प्रचार करावा अशी मागणी केली होती मात्र अजून तरी प्रियांका गांधी प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसलेले नाही. काँग्रेसच्या या नेत्यांनी प्रचारापासून स्वतः ला दूर का ठेवले आहे हा खरा प्रश्न आहे. दिल्लीत मिळवण्यासारखे काहीच नाही याचा अंदाज आल्याने नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली अशी चर्चा आहे. मागील दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीत खाते सुद्धा उघडता आले नाही त्यामुळे कार्यकर्ते मनोबल खचले आहे. विशेष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दिल्लीतच आहेत. तरीदेखील त्याची प्रचारातील गैरहजेरी अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
हरियाणा अन् महाराष्ट्राने दिला झटका
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. खासदारांची संख्या 99 झाली. यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्राने दोन मोठे धक्के दिले. हरियाणात काँग्रेसचे वारे वाहत असल्याचे सांगितले जात असतानाच पराभव झाला. महाराष्ट्रात तर पक्षाची अवस्था आणखी खराब झाली. कसे तरी 16 आमदार निवडून आणता आले. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसने जास्त ताकद लावली नाही असे काही जाणकार सांगतात.
केजरीवाल, CM अतिशी अन् सिसोदियांसाठी इलेक्शन टफ; ‘आप’च्या शिलेदारांची कोंडी!
कांग्रेसकडून आप उमेदवारांची कोंडी
निवडणुकीची घोषणा होण्याआधी काँग्रेस नेत्यांचा आविर्भाव पाहून असे वाटतं होते की यंदा काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जोरदार प्रचार करतील असे स्थानिक नेत्यांनी सांगितले होते. भाजपवर टीका करतानाच काँग्रेसने आम आदमी पार्टीवरही तोफ डागण्यास सुरूवात केली. अरविंद केजरीवाल, अतिशी मार्लेना, मनीष सिसोदिया यांच्या विरुद्ध तगडे उमेदवार देऊन निवडणुकीत असल्याचे काँग्रेसने दाखवून दिले.
परंतु उमेदवार देण्यापर्यंतच पक्षाचे नियोजन होते का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण पक्षाचे वरिष्ठ नेते अजूनही प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. स्थानिक नेत्यांच्या ताकदीवरच प्रचार केला जात आहे. प्रचारासाठी आणखी आठवडा बाकी आहे. या काळात तरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रचारात उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.