आपच्या एन्ट्रीने काँग्रेस साफ, भाजपलाही धक्का; वाचा 3 CM बदलण्याचा किस्सा!
Delhi Assembly Elections 2025 : दिल्लीचं राजकारण काँग्रेस आणि भाजप यांच्या भोवतीच फिरत असायचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे काँग्रेसच सरकार (Congress Party) होतं. नंतर काही कारणांमुळे विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. सुरुवातीचे दोन मुख्यमंत्री काँग्रेसचे राहिले. सन 1993 मध्ये पुन्हा विधानसभेची व्यवस्था लागू करण्यात आली.
सन 1993 ते 2020 पर्यंत दिल्लीत विधानसभच्या एकूण सात निवडणुका झाल्या. या 27 वर्षांच्या राजकारणात दिल्लीत एकूण सहा मुख्यमंत्री राहिले. यामध्ये तीन महिला मुख्यमंत्री होत्या. सुरुवातीच्या काळात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच संघर्ष असायचा. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. पाच वर्षांची राजवट भाजपसाठी सोपी नव्हती. बहुमत असतानाही या पाच वर्षांच्या काळात तीन मुख्यमंत्री बदलले.
सर्वात आधी मदनलाल खुराणा मुख्यमंत्री बनले. त्यांच्या राजीनाम्यानंतर साहिब सिंह वर्मा यांना जबाबदारी मिळाली. परंतु वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने विधानसभा निवडणुकीआधी भाजपने त्यांना बाजूला करून सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केलं. भाजपची ही रणनीती देखील यशस्वी ठरली नाही.
भाजपचा पराभव, यंदा अनुकूल स्थिती
सन 1998 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने भाजपला नाकारलं. काँग्रेसने विजय मिळवत दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून काँग्रेसने शीला दीक्षित यांना प्रोजेक्ट केलं होतं. याचा फायदा पक्षाला मिळाला. या निवडणुकीत काँग्रेसचे 52 आमदार निवडून आले. भाजपला फक्त 15 जागा मिळाल्या तर दोन जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या.
केजरीवाल, CM अतिशी अन् सिसोदियांसाठी इलेक्शन टफ; ‘आप’च्या शिलेदारांची कोंडी!
शीला दीक्षित यांचा हा कार्यकाळ दिल्लीच्या विकासाचा काळ म्हणून ओळखला जातो. दिल्लीकरांना 2002 मध्ये मेट्रो मिळाली. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक गतिमान झाला. या विकासकामामुळे 2003 च्या निवडणुकीत जनतेने पुन्हा काँग्रेसलाच निवडून दिलं. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या पाच जागा कमी झाल्या होत्या. दीक्षित यांच्या दुसऱ्या कार्यकाळात दिल्लीत अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारले गेले. रस्त्यांचे जाळे अधिक वाढले. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी नियंत्रणात आला.
काँग्रेस लढण्याच्याच तयारीत
सन 2008 मध्ये देखील विजयाची परंपरा काँग्रेसने कायम राखली. या निवडणुकीत काँग्रेसला 43 जागा मिळाल्या. यंदा दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत होणार आहे. यंदा काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. आपली दुरावलेली मते पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. तर सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न आपकडून होत आहे. भाजपही जोरदार तयारी करून मैदानात उतरला आहे.
दिल्लीत आपच्या रुपात नव्या पार्टीची एन्ट्री
2013 आधी भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षातच लढत होत असायची. याच दरम्यान दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं (Anna Hajare) आंदोलन झालं. काँग्रेसवर घोटाळ्यांचे आरोप झाले. यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा चांगलीच डागाळली. लोकांमध्ये जाणं देखील काँग्रेस नेत्यांना अडचणीचं ठरू लागलं. अशातच आम आदमी पार्टीच्या रूपाने दिल्लीच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री झाली.
दिल्लीच्या मैदानात वारसदारांची अग्निपरीक्षा; माजी पीएम अन् सीएमचे कुटुंबीय रिंगणात..
28 जागा जिंकून आप नंबर वन
अरविंद केजरीवाल यांच्या (Arvind Kejriwal) नेतृत्वात पक्षाने 28 जागा जिंकून इतिहास रचला. शीला दीक्षित यांना थेट आव्हान देत केजरीवाल विजयी झाले. तरीही भाजप सर्वात मोठा पक्ष होता. पण स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नव्हता. भाजपला 32 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त 8 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या मदतीने केजरीवाल यांनी सरकार स्थापन केले. परंतु 49 दिवसांतच राजीनामा देखील दिला.
फेब्रुवारी 2015 मध्ये पुन्हा निवडणुका होईपर्यंत एक वर्षांपेक्षा जास्त काळ दिल्लीत राष्ट्रपती राजवट राहिली. फेब्रुवारी 2015 मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागा जिंकून इतिहास रचला. भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. 2020 मधील निवडणुकीतही आपने चांगले प्रदर्शन केले. या निवडणुकीत आपने 62 जागा जिंकल्या होत्या.