India Corona Update : देशातील घटलेल्या कोरोना रूग्णसंख्येने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेली आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी अशीच आहे. ज्या पद्धतीने कोरोना बाधित आढळून येत आहे ही स्थिती अशीच राहिल्यास देशात एप्रिल 2021 सारखी परिस्थीती उद्भवेल अशी भीती आरोग्य विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली असून, ही संख्या 134 दिवसांतील सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. सकाळी 8 वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 300 झाली आहे. त्याचवेळी, काल देशात कोरोनामुळे 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये रविवारी प्रत्येकी एका रूग्ण्याच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे, तर दक्षिणेकडील केरळ राज्यात दोन जणांचा मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दिल्लीत 153 नव्या रूग्णांची नोंद
राजधानी दिल्लीत कोरोनाचे 153 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी दिल्लीत 139 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तीन आकड्यांमध्ये रूग्णसंख्या नोंदवली जात होती.
बाधितांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
देशभरात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. त्यानंतर आता नव्या बाधित होणाऱ्या संख्येतदेखील पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 19 ते 25 मार्च दरम्यान राज्यात 1956 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात ही संख्या 1165 होती. ही संख्या लक्षात घेता राज्यात एका आठवड्यात 68 टक्के वाढ झाली आहे. यासोबतच इतर अनेक राज्यांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ दिसून येत आहे.
दरम्यान, वाढती कोरोनो बाधितांची संख्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारकडून सावध पावलं उचलली जात आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमात देशवासियांना वाढत्या कोरोना संख्येत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता येत्या 10 आणि 11 एप्रिल रोजी देशभरात मॉक ड्रिल घेतले जाणार आहे.