डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump). अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा पहिला कार्यकाळ बघितल्यास कधी काय निर्णय घेतील, कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नसायचा. आताही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. यात जो बायडेन (joe biden) यांच्या काळातले तब्बल 78 निर्णय फिरवले आहेत. यातील काही निर्णयांचा परिणाम थेट भारतावर होणार आहे. शिवाय अमेरिकेतील 48 लाख भारतीय-अमेरिकन नागरिकही टेन्शनमध्ये आले आहेत. (Donald Trump made many decisions in just 24 hours after being sworn in as President)
सत्तेवर येताच ट्रम्प यांनी पहिला निर्णय घेतला तो पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा. जगभरातील 200 देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी केलेला हा अतिशय महत्त्वाचा करार आहे. याआधीही 2017 मध्ये ट्रम्प यांनी अमेरिका पॅरिस करारातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. पण 2021 मध्ये जो बायडेन सत्तेवर आल्यावर अमेरिका पुन्हा करारात सहभागी झाली होती. ट्रम्प यांनी दुसरा महत्वाचा निर्णय घेतला तो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओ या महत्त्वाच्या संस्थेतून बाहेर पडण्याचा. कोविड महासाथीच्या काळात डब्लूएचओने केलेल्या कामगिरीवर ट्रम्प यांनी टीका केली होती. त्यावेळीच त्यांनी संघटनेतून बाहेर पडण्याची सुरुवात केली होती. मात्र, नंतर बायडेन यांनी त्यांचा निर्णय रद्द केला होता.
ट्रम्प यांनी अमेरिकेत बाहेरून येणाऱ्या, स्थलांतर करणाऱ्या नागरिकांबाबतही कठोर निर्णय घेतले आहेत. स्थलांतरितांसाठींच्या योजनेलाही ट्रम्प यांनी स्थगिती दिली आहे. या योजनेअंतर्गत क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला येथील 30 हजार स्थलांतरितांना अमेरिकेत येण्याची परवानगी दिली होती. ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिकोवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. तसेच मेक्सिकोहून येणाऱ्या निर्वासितांसाठी कार्यकारी आदेशही जारी केले आहेत. मेक्सिको सीमेवर जास्त सैनिक तैनात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेक्सिको सीमेवर पुन्हा भिंत बांधण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर आणीबाणीच्या घोषणेचा एक भाग म्हणून ट्रम्प यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.
राष्ट्राध्यक्ष होताच, ट्रम्प यांनी जवळपास 1500 समर्थकांना माफी दिली आहे. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल हिंसाचारासाठी अटक केलेल्या सुमारे 1500 ट्रम्प समर्थकांना त्यांनी माफ केले आहे. ट्रम्प यांनी तृतीय लिंग संकल्पना रद्द करताना म्हटले आहे की, देशात स्त्री आणि पुरुष असे दोनच लिंग असतील. त्यामुळे अमेरिकेत थर्ड जेंडरला दिल्या जाणाऱ्या सुविधा संपुष्टात येणार आहेत. ट्रम्प यांनी चिनी मालकीची सोशल मीडिया कंपनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या कायद्यावरील निर्देशावरही स्वाक्षरी केली आहे. आता टिकटॉकवरील बंदी 75 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. यावेळी शॉन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला. ट्रम्प यांनी करन यांची गुप्तचर सेवेचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे भारतीयही चांगलेच धास्तावले आहेत. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांच्या गटाला धमकी दिली असून अमेरिकाविरोधी धोरणे आणल्यास परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले आहे. या गटात भारताचाही समावेश आहे. भारतीय धास्तावण्याचे दुसरे कारण म्हणजे, अमेरिकन राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती जिचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर झाला आहे, ते अमेरिकेचे नागरिक होतात. मात्र, दीडशे वर्षे जुना घटनात्मक अधिकार ‘निरर्थक’ असल्याचे सांगत ट्रम्प यांनी हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थलांतरित धोरण आणि अमेरिकेमध्ये जन्मलेल्या लाखो मुलांसाठी, विशेषतः मोठ्या आणि वाढत्या भारतीय-अमेरिकन समुदायावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय-अमेरिकन समुदाय, अमेरिकेमधील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या स्थलांतरित लोकसंख्येपैकी एक आहे.
अमेरिकेच्या जनगणनेनुसार, 48 लाखांहून अधिक भारतीय-अमेरिकन लोक अमेरिकेमध्ये राहतात. त्यात अमेरिकेत जन्मलेल्या आणि त्यामुळे नागरिकत्व मिळालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. एच-1बी व्हिसाधारकांसारख्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांच्या मुलांवरही या आदेशाचा प्रामुख्याने परिणाम होऊ शकतो. अशा व्हिसाधारकांची मुले अमेरिकेत जन्माला आली तर त्यांना नागरिकत्व मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. याशिवाय ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांवरील कारवाईअंतर्गत अवैध भारतीय नागरिकांची घरवापसी करण्याचे जाहीर केले आहे. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, 18 हजार बेकायदा स्थलांतरीत भारतीय अमेरिकेहून परत पाठवले जाणार आहेत. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका एकमेकांना सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत.
ट्रम्प यांच्या निर्णयांचा परिणाम मंगळवारी सकाळी शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू होताच दिसून आला, सेन्सेक्स 1235अंकांनी कोसळला. या घसरणीमुळे लिस्टेड कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात 7.55 लाख कोटींची घट झाली. आता ट्रम्प यांच्या या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं? या निर्णयांचे भारतावर कसे परिणाम होऊ शकतात? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.