Electronic goods to become costlier : दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपासून एसी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिजसह विविध घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून विविध कारणांमुळे दरवाढीची तयारी सुरू करण्यात आली आहे. तांबे, अल्युमिनियम, स्टीलसह विविध कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार, कच्च्या तळाशी संबंधित उत्पादनांचा वाढलेला खर्च आणि वाहतुकीवरील वाढत खर्च यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
त्यातच आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचाही पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. 1 ऑक्टोबरपासून एसीच्या किमतींमध्ये साधारण 5 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्हीच्या किमतींमध्ये साधारण 3 ते 4 टक्क्यांची वाढ होऊ शकते. विविध उत्पादन आणि कंपन्यांनुसार ही दरवाढ वेगवेगळी असण्याची शक्यता आहे. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिनसह विविध प्रमुख कंपन्यांकडून दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत.
रिचार्जमध्ये ग्राहकांना दिलासा, राघव चड्ढांच्या मागणीनंतर आता 28 ऐवजी 30 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन
काही कंपन्यांनी यापूर्वीच उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत, तर काही कंपन्या ऑक्टोबरपासून नव्या किमती लागू करण्याच्या तयारीत आहेत. यंदाच्या वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची ही आणखी एक मोठी दरवाढ ठरणार आहे. ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनीही कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींकडे लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने कंपन्यांवर दरवाढीचा दबाव निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र करातील काही लाभांमुळे संपूर्ण वाढ ग्राहकांवर टाकली जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे दसरा आणि दिवाळीच्या काळात एसी, टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीत मोठी वाढ होते. कंपन्यांकडूनही या काळात विविध ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्या जातात. मात्र यंदा फेस्टिव्ह ऑफर्स सुरू होण्यापूर्वीच मूळ किमती वाढल्यास सवलतीचा प्रत्यक्ष फायदा किती मिळणार, हा प्रश्न ग्राहकांसमोर असणार आहे.
डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण; 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेला अटक
काही विक्रेत्यांकडे जुन्या किमतीत खरेदी केलेला माल उपलब्ध असल्याने सुरुवातीच्या काळात दरवाढीचा परिणाम प्रत्येक ठिकाणी लगेच दिसेलच असे नाही. मात्र जुना साठा संपल्यानंतर नवीन किमतींचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा दसरा-दिवाळीचा सण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीसा महागडा ठरण्याची चिन्हे आहेत.
