Download App

“शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता” : PM मोदींसमोरच गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले आहेत, अशीही थेट तुलना त्यांनी केल्याने त्यांच्यावर आता टीकाही होऊ लागली आहे.

अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा सोहळा द्विगुणित झाला.

रामलल्ला विराजमान, दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आरती वेळ अन् प्रसिद्ध ठिकाण

या कार्यक्रमानंतर कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. याचवेळी बोलताना गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. (Govind Devagiri Maharaj has started a new controversy by making a statement about Chhatrapati Shivaji Maharaj.)

काय म्हणाले गोविंदगिरी महाराज?

जेव्हा मला 20 दिवसआधी मला सांगण्यात आले की, पंतप्रधानांना स्वतःला कोणकोणते अनुष्ठान करुन सिद्ध करावे लागणार… त्याची नियमावली तुम्ही लिहून पाठवा. तेव्हा आम्ही आमच्या महापुरुषांकडून परामर्श घेऊन पंतप्रधानांना सांगितले की, आपल्याला केवळ तीन दिवसाचा उपवास करावा लागेल. पण आपण 11 दिवसांचा संपूर्ण उपवासच केला. त्यांनी अन्नाचाच त्याग केला, असा तपस्वी राष्ट्रीय नेता प्राप्त होणे ही सामान्य बाब नाही.

सांसर्गिक दोष येतात म्हणून आम्ही त्यांना परदेशात प्रवास न करण्याची सूचना दिली. त्यांनी काही देशांचा प्रवास टाळला. पण दिव्य देशाचा प्रवास करत नाशिकवरुन ते श्रीरंगमला आणि रामेश्वरमला गेले. संपूर्ण भारताच्या दिव्य ठिकाणी जाऊन जणू ते निमंत्रण देत होते की “दिव्य आत्म्यांनो अयोध्येला या आणि आमच्या देशाला महान बनवण्यासाठी आशिर्वाद द्या”. आम्ही त्यांना तीन दिवस जमिनीवर झोपण्यास सांगितले होते. तुम्ही या कडाक्याच्या थंडीत 11 दिवसांपासून जमिनीवर झोपलात.

चरणामृत सेवन करून मोदींनी सोडला उपवास; चरणामृत म्हणजे काय? सेवनाचे आहेत अनेक फायदे

हा जो तप आम्ही तुमच्यात पाहिला, ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे मल्लिकार्जुन दर्शनासाठी श्रीशैलमला गेले, तीन दिवसांचा उपवास केला, तीन दिवस शिवमंदिरात राहिले, तेव्हा महाराज म्हणाले, मला राज्य करायचे नाही. मला संन्यास घ्यायचा आहे. शिवाची आराधना करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मला संन्यास घ्यायचा आहे, परत घेऊन जाऊ नका. इतिहासातील हा विलक्षण प्रसंग आहे. त्या प्रसंगात महाराजांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत घेऊन आले. कारण स्वराज्य हेही तुमचे कार्यच आहे.

आज असेच एक महापुरुष आपल्याला भेटले, ज्यांना आई जगदंबेने हिमालयातून परत पाठविले आणि सांगितले जाऊन भारत मातेची सेवा कर. तुला भारत मातेची सेवा करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचीही मला आठवण आली. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हंटले होते की, निश्चयाचा महामेरु, बहुतजणांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी.. श्रीमंत योगी. आपल्याला असेच एक श्रीमंत योगी आज मोदींच्या रुपात भेटले आहेत, असेही ते म्हणाले.

follow us