Download App

Sukhdev Singh Gogamedi : पाच दिवस गुंगारा दिला पण, ‘त्या’ फोटोने गोगामेडींचे मारेकरी झाले गजाआड

Sukhdev Singh Gogamedi Murder Update : राजपूत करणी सनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडीवर (Sukhdev Singh Gogamedi) गोळ्या झाडणाऱ्या दोन शूटर्ससह तीन लोकांना चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा व्यक्ती तो आहे ज्याने दोन्ही शूटर्सना गोळीबारानंतर पळून जाण्यास मदत केली. पाच दिवस पोलिसांना गुंगारा देणारे शूटर्स चार राज्यांत फिरले. मात्र, असा एक फोटो समोर आला ज्यामुळे त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांच्या हवाल्याने हा फोटो समोर आला आहे. ज्याच्या मदतीने पोलिसांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढले.

हा फोटो हरियाणातील धारूहेडा रेल्वे स्टेशन परिसरातील आहे. या फोटोत मारेकरी स्टेशन परिसरात फिरत असताना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने त्यांना टिपले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर दोन्ही आरोपी डीडवाना येथे पळून गेले होते. तेथून पुढे धारूहेडाला पोहोचले. पहिला पुरावा धारूहेडा येथूनच मिळाला. यानंतर राजस्थान पोलिसांनी दिल्ली स्पेशल सेलच्या मदतीने मोनू मानेसरसह काही कैद्यांकडे चौकशीही केली.

20 सेकंदात रिकामं केलं मॅगजिन, राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या

दुसरीकडे आरोपी जयपूर मार्गे डीडवाना-सुजानगढ-धारूहेडा पर्यंत पोहोचले. पुढे बसने मनाली येथे पोहोचले आणि परत चंदीगड येथील सेक्टर-22 येथे पोहोचल्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या दोघांबरोबर आणखी एक व्यक्ती होता त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याच व्यक्तीने दोघा जणांना पळून जाण्यात मदत केली होती.

पळून गेल्यानंतर आरोपी मोबाइल वापरत होते. टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. शूटर्स गँगस्टर रोहित गोदाराचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वीरेंद्र चौहान आणि दानाराम यांच्या संपर्कात होते. वीरेंद्र चौहान आणि दानाराम यांच्या इशाऱ्यावर हत्या घडवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आता या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. या हत्याकांडानंतर आरोपी राजस्थानातून हरियाणातील हिसार येथे पोहोचले. तेथून पुढे मनाली आणि चंदीगडला पोहोचले होते. येथे मात्र पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

पोलीस या आरोपींना घेऊन दिल्लीला पोहोचले आहेत. यानंतर आता या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत असून मुख्य सूत्रधाराला शोधून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या घटनेनंतर राजस्थानात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लॉरेन्स बिन्शोई गँग मास्टरमाईंड, दुबईत प्लॅन अन् जयपूरमध्ये गेम! सुखदेव सिंहांच्या हत्येची Inside Story

Tags

follow us