TDP-JDU Ministry Demand : लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या (TDP JDU Ministry Demand) जेडीयूचं महत्व प्रचंड वाढलं आहे. याच कारणामुळे दोन्ही पक्षांनी भाजपवर प्रेशर पॉलिटिक्स सुरू केलं आहे. या दोन्ही पक्षांनी प्रमुख मंत्रालयांची मागणी केली आहे. टीडीपीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्टीने लोकसभेच्या स्पीकर पदासह पाच मोठ्या मंत्रालयांची मागणी केली आहे. टीडीपी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी जास्त प्रयत्न करत आहे. राजधानी दिल्लीत काल एनडीएची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू सुद्धा उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या खुर्चीवर नायडू बसल्याचे फोटोही झळकले होते. नायडूंच्या शेजारी नितीशकुमार बसले होते. टीडीपी सध्या एनडीएत दुसरा मोठा पक्ष आहे. या पक्षाचे 16 खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे 12 खासदार आहेत. 240 जागांंसह भाजप हा एनडीए आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याव्यतिरिक्त शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार आहेत.
Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार नायडूंनी स्पष्ट केले आहे की ते या सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावू इच्छितात. पक्षाला कोणती मंत्रालये हवी आहेत. पक्षाच्या आणखी काय मागण्या आहेत याची यादी भाजप नेतृत्वाला देण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेचे अध्यक्षपद, कमीत कमी पाच मंत्रालयांचा समावेश आहे. टीडीपीने अर्थ मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय यांसारख्या महत्वाच्या मंत्रालयांची मागणी केली आहे.
तेलुगु देसम पक्षाला लोकसभेचे स्पीकर पद हवे आहे. यामुळे लोकसभेतील सर्वात ताकदीचे पद त्यांच्याकडे असेल. त्रिशंकू परिस्थितीत स्पीकरची भूमिका महत्वाची असते. पक्षाचे दिवंगत नेते जीएमसी बालयोगी 1998 ते 2002 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते.
टीडीपीच्या एका खासदाराने सांगितले की ग्रामीण विकास, रस्ते परिवहन आणि राजमार्ग, जलशक्ती अशी महत्वाची मंत्रालये मिळावीत अशी आमची मागणी आहे. तसेच अर्थ मंत्रालयात एक कनिष्ठ मंत्रिपदही पाहिजे आहे. सध्या आंध्र प्रदेशला निधीची सर्वाधिक गरज आहे.
Solapur Loksabha : अखेर सोलापुरकरांनी बीडचं पार्सल पाठवलं! प्रणिती शिंदे खासदार बनल्या…
एनडीटीव्ही सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयूने तीन मंत्रालयांची मागणी केली आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही पक्षाने केली आहे. जेडीयूने चार खासदारांच्या बदल्यात एक मंत्रालय असा फॉर्म्यूला समोर ठेवला आहे. जेडीयूचे बारा खासदार आहेत. नितीश कुमारांची इच्छा आहे की पक्षाला रेल्वे, कृषी आणि वित्त मंत्रालय मिळावे. दोन्ही पक्षांच्या मागण्या पाहता भाजपाची कोंडी होताना दिसत आहे. मोदी-शहांची कार्यपद्धती पाहता टीडीपी आणि जेडीयूच्या मागण्या मान्य होणार का, इतकी मोठी तडजोड भाजप मान्य करणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.