Gujarat Lok Sabha Election 2024 : ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे सीएम आणि देशाचे पीएम सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत होता. सन 1989 पासून प्रत्येक निवडणुकीत भाजपने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काळात केंद्रात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील युपीए सरकार असतानाही गुजरात भाजपलाच कौल देत होता.
2014 आणि 2019 या सलग दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधील सर्व 26 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या जागांपैकी 18 जागा अशा होत्या जिथे पक्षाचे उमेदवार तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले होते. आताच्या निवडणुकीत तर भाजपने प्रत्येक मतदारसंघात पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होण्याचे टार्गेट सेट केले आहे.
बॉलिवूडच्या ‘काकां’चाही करिश्मा फेल; गांधीनगरचा ‘भगवा’ किल्ला अभेद्यच!
याच निवडणुकीत 15 जागा अशा होत्या जिथे भाजपला 60 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. तर चार जागा अशा होत्या जिथे भाजप उमेदवारांनी चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गांधीनगर मतदारसंघात भाजपला 69.7 टक्के, वडोदरामध्ये रंजनाबेन भट्ट यांना 72.3 टक्के, सूरतमध्ये दर्शना जरदोश यांना 74.5 टक्के, नवसारी मतदारसंघात सीआर पाटील यांना 74.4 टक्के मते मिळाली होती. मागील काही निवडणुकांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की येथे काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत सातत्याने घसरण होत आहे.
भाजप सन 1998 पासून राज्यात सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकत आला आहे. 2022 च्या निवडणुकीत पक्षाने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला होता. या निवडणुकीत तब्बल 156 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त 17 जागा जिंकता आल्या होत्या. 2017 मधील निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसची ही सर्वाधिक खराब कामगिरी राहिली.
गुजरामध्ये काँग्रेसला एकामागोमाग एक झटके बसत आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मार्च महिन्यात दिग्गज नेते अर्जुन मोढवाडिया यांनी पक्ष सोडला होता. मोढवाडिया राज्यातील मोठे ओबीसी नेते आहेत आणि अनेक वर्षांपासून भाजप विरोधात काँग्रेसचे नेतृत्व करत होते. यानंतर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रोहन गुप्ता यांनी थोड्या दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता.
Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
2022 मधील विधानसभा निवडणुकीआधी पाटीदार आरक्षण आंदोलनाने चर्चेत आलेले हार्दिक पटेल आणि ठाकोर समाजाचे नेते अल्पेश ठाकोर सुद्धा भाजप नेते बनले आहेत. अशा पडझडीत काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत चांगले प्रदर्शन करणार का हा खरा प्रश्न आहे. आता राजकोट मतदारसंघातील भाजप उमेदवार पुरुषोत्तम रूपाला यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेत्याना असा विश्वास वाटत आहे की आगामी निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होईल.