मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये मोठा तांत्रिक बिघाड, ॲमेझॉन आणि गुगलच्या सेवांमध्येही अडचणी

गुरुवारी दुपारपासून सुरू झालेल्या या ग्लोबल आउटेजचा सर्वाधिक परिणाम मायक्रोसॉफ्ट 365, आऊटलूक आणि टीम्स या सेवांवर झाला आहे.

Untitled Design   2026 11 13T095432.130

Untitled Design 2026 11 13T095432.130

Major technical glitch in Microsoft’s servers : जगभरातील कोट्यवधी यूझर्ससाठी महत्त्वाच्या असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवा अचानक ठप्प झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारपासून सुरू झालेल्या या ग्लोबल आउटेजचा सर्वाधिक परिणाम मायक्रोसॉफ्ट 365, आऊटलूक आणि टीम्स या सेवांवर झाला आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाज, ई-मेल, ऑनलाइन मीटिंग्स आणि मेसेजिंगमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्ट सोबतच अमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि गुगलच्या काही सेवांमध्येही तांत्रिक अडचणी आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ऑनलाइन सेवांमधील बिघाडावर लक्ष ठेवणाऱ्या Downdetector.com या वेबसाइटनुसार, आऊटलूक मध्ये सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तब्बल 1 लाख 30 हजार यूझर्सनी आऊटलूक संदर्भात समस्या असल्याचे सांगितले आहे.

याशिवाय मायक्रोसॉफ्ट टीम्स मध्येही अडचणी आल्याने ऑनलाइन मीटिंग्स घेणे आणि सहकाऱ्यांशी संवाद साधणे कठीण झाले. मायक्रोसॉफ्ट 365 वापरणाऱ्या अनेक कंपन्यांचे कामकाजही विस्कळीत झाले. या जागतिक तांत्रिक बिघाडाची मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे पुष्टी केली आहे. कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, मायक्रोसॉफ्ट 365 सेवा वापरताना यूझर्सना अडचणी येत आहेत. विशेषतः एक्स्चेंज ऑनलाईनशी संबंधित समस्या अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जेन्सेन हुआंग यांच्यावर तिसऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबतच्या अफेअरचा आरोप, चीनच्या गुप्तचर यंत्रणांशी कनेक्शनचा संशय

या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी कंपनीची तांत्रिक टीम काम करत असून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मायक्रोसॉफ्टच्या आउटेजचा परिणाम इतर टेक कंपन्यांवरही झाला आहे. ओपन एआय ने मायक्रोसॉफ्ट कनेक्टरशी संबंधित तांत्रिक समस्येची तपासणी सुरू असल्याचे सांगितले आहे. यामुळे नवीन कनेक्शन तयार करण्यात आणि काही टूल्स वापरण्यात अडचणी येऊ शकतात.

अँथ्रोपिक या एआय कंपनीलाही अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त आहे. या आउटेजचा परिणाम कंपन्यांच्या महत्त्वाच्या कामांवरही झाला आहे. इलेक्ट्रिक ट्रक तयार करणाऱ्या वर्कहॉर्स ग्रुप कंपनीला 12 नोव्हेंबर रोजी तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करायचे होते. मात्र, मायक्रोसॉफ्टच्या सेवांमधील तांत्रिक बिघाडामुळे कंपनीने निकाल जाहीर करण्याची तारीख 16 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यातही मायक्रोसॉफ्टच्या अझूर क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. आता पुन्हा एकदा कंपनीच्या सेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्याने डिजिटल जग मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर किती अवलंबून आहे, हे समोर आले आहे. कंपनीकडून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून, आउटेजचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Exit mobile version