Congress party : लोकसभा निवडणुका तोंडावर (Lok Sabha Election) आलेल्या असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress Party) जोरदार धक्के बसत आहेत. दिग्गज नेते ज्यांनी अनेक वर्ष पक्षात राहून राजकारण केलं, पक्ष वाढवला आणि मोठी पदे भूषवली तेच नेते एका मागोमाग एक काँग्रेसचा हात सोडत आहेत. नेते सोडून जात आहेत तरीही त्यांना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत नाहीत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी घडत असल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेची उमेदवारी मिळवली. यानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील मोठे नेते कमलनाथ (Kamal Nath) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. वयाच्या 22 व्या वर्षीच कमलनाथ यांनी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती. 1980 मध्ये छिंदवाडा मतदारसघांतून विजयी होत खासदार झाले. संजय गांधी यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रीचे किस्से प्रसिद्ध आहेत. इतकेच नाही तर मध्य प्रदेशात सलग 15 वर्षांचा दुष्काळ संपवत त्यांनी काँग्रेसला 2018 मध्ये सत्ता मिळवून दिली होती. आता मात्र हेच दिग्गज काँग्रेसी कमलनाथ लवकरच भाजपाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा होत आहे.
चंदीगड : विनोद तावडेंची सलग तिसऱ्या वर्षी चालाखी… पण सर्वोच्च न्यायालयाने डाव उधळला!
कमलनाथ यांनी जर खरच भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. कारण आता लोकसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांपेक्षा कमी काळ राहिला आहे. मागील दहा वर्षांचा विचार केला तर काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची यादी मोठी आहे. यामध्ये काही माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
चव्हाणांची भाजपात एन्ट्री, राज्यसभेचं तिकीटही मिळालं
महाराष्ट्राचे दोन वेळचे मुख्यमंत्री राहिलेले आणि राजकारणातील 40 वर्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये व्यतीत केले. काँग्रेसने त्यांना अनेक महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. अशोक चव्हाण पक्षावर नाराज आहेत आणि ते पक्ष सोडून जातील याची कुणकुण वरिष्ठ नेत्यांना होती परंतु त्यांना थांबवण्याचे प्रयत्न काँगेसने कसोशीने केले नाहीत असे आता सांगितले जात आहे.
अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश करत राज्यसभेची उमेदवारी मिळवली. सन 1987 मध्ये चव्हाण पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी त्यांना मिळाली. राजकीय कारकीर्दीत अशोक चव्हाण दोनदा खासदार आणि चार वेळेस आमदार राहिले आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री राहिले आहेत. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात अशोक चव्हाण दीड वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) विजय मिळवत खासदार झाले. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सुद्धा काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
उत्तर प्रदेशात ‘सपा’ला धक्का! निवडणुकीआधीच ‘या’ दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
एसएम कृष्णा यांनी सोडला हात
सन 1999 ते 2004 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले एसएम कृष्णा यांनी 2017 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. सन 1968 मध्ये कृष्णा पहिल्यांदा खासदार झाले होते. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत कृष्णा यांच्या नेतृत्वात काँग्रेसला विजय मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही कृष्णा यांनी काम केले आहे. आता कृष्णा यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.
किरणकुमार रेड्डी
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी 2023 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. अविभाजित आंध्रप्रदेशचे ते शेवटचे मुख्यमंत्री होते. 2014 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करून तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात किरणकुमार रेड्डी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी ‘जय समैक्या आंध्र पार्टी’ हा राजकीय पक्ष स्थापन केला होता. परंतु 2018 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस जॉईन केली. मागील वर्षात त्यांनी भाजपात प्रवेश केला.
32 आमदारांसह पेमा खांडू भाजपवासी
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आधी काँग्रेसमध्येच होते. पुढे 2016 मध्ये पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या 32 आमदारांना घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. खांडू सरकार 2016 पासून राज्यात सत्तेवर आहे. आधी या सरकारचे नेतृत्व काँग्रेस करत होते. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये काँग्रेसचे सर्व आमदार पीपीए पक्षात सहभागी झाले. यानंतर त्यांना सरकार कायम ठेवण्याची अनुमती मिळाली होती.
‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का! जागावाटपाच्या चर्चा फेल; ‘समाजवादी पार्टी’चा स्वबळाचा नारा?
नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे कधीकाळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांत गणले जात होते. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि भाजपाला पाठिंबा दिला. पुढे 2019 मध्ये राणे भाजपात सामील झाले. नारायण राणे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर बदलत्या राजकारणात 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कॅप्टन अमरिंदर सिंह
पंजाबच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांत माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 2021 मध्ये काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. राजघराण्यातील अमरिंदर सिंह भारतीय सैन्यात होते. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धातही होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आग्रहानंतर 1980 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसर मतदारसंघात भाजप उमेदवार अरुण जेटली यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. पुढे 2017 मध्ये काँग्रेसने पटियालाच्या महाराजांना संधी दिली. त्यानंतर तब्बल साडे चार वर्षानंतर राजकारण फिरले आणि अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर त्यांनी काँग्रेसचा हात सोडला.
विजय बहुगुणा
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मे 2016 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्याबरोबर 8 माजी आमदार सुद्धा होते. 2014 मध्येच बहुगुणा यांनी राजीनामा दिला होता. 2012 ते जानेवारी 2014 या काळात ते मुख्यमंत्री होते. विजय बहुगुणा यांच्या भगिनी उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहिल्या आहेत. त्यांचे वडील हेमवती नंदन बहुगुणा यांचा परिवार वर्षानुवर्षे काँग्रेसमध्येच राहिला. याव्यतिरिक्त नारायण दत्त तिवारी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, लुईजिन्हो फलेरो, प्रताप सिंह राणे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल यांनी सुद्धा काँग्रेसचा हात सोडला.