Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि इंडिया आघाडीला (Lok Sabha Election) झटक्यांवर झटके बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशातील जयंत चौधरी बाजूला झाले आहेत. तर फारुक अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवाल सुद्धा याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मजबूत वाटणारी इंडिया आघाडी (INDIA Alliance) आता गलितगात्र झाली आहे. केंद्रातील सत्तधारी भाजपला आता कशी टक्कर देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंडिया आघाडीकडे आता शिल्लक काय राहिले आहे? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
उत्तर प्रदेश, बिहारपासून पश्चिम बंगालपर्यंत आघाडीचे गणित बदलले आहे. आधी ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि नंतर जयंत चौधरी (Jayant Chaudhary) इंडिया आघाडी पासून दुरावले आहेत. अशा परिस्थितीत घटक दल टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आघाडीसमोर उभे राहिले आहे. भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीसमोर एकास एक उमेदवार देण्याच्या उद्देशाने विरोधी पक्ष एकत्र आले होते. मोठा गाजावाजा करून एकत्र आलेल्या या आघाडीत दोन डझन पेक्षा जास्त पक्ष सहभागी झाले होते. दिल्लीत झालेल्या बैठकीपर्यंत जास्त फाटाफूट झाली नव्हती. नंतर मात्र तीन मोठ्या पक्षांनी आघाडीला धक्का दिला.
PM Modi : “काँग्रेसअंतर्गत कलह, खोटे आरोप करणे हाच त्यांचा अजेंडा”; PM मोदींचा घणाघात
त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम् आदमी पार्टीने दिल्लीतील सात लोकसभा जागांपैकी फक्त एक जागा काँग्रेसला देऊ केली आहे. या प्रस्तावावर वेळेत उत्तर येत नसल्याने आपने गुजरात, गोवा यांसारख्या राज्यात उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. जागावाटपाची चर्चा सुरू असताना अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला हा निर्णय आघाडीसाठी आणखी अडचणी निर्माण करणारा ठरणार आहे. याआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही असाच प्रयोग केला होता. जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच काही जागांवर उमेदवार घोषित केले होते. आता आम् आदमी पार्टी सुद्धा असेच करत आहे.
जम्मू काश्मीरमधील वाटचालही कठीण
जम्मू काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्सही इंडिया आघाडीशी फारकत घेण्याच्या तयारीत दिसत आहे. फारुक अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमधील सर्व जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. एनडीए बरोबर जाण्याच्या चर्चाही त्यांनी नाकारली नाही. तर दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की जागावाटपातबाबत अद्याप कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. चर्चा झाली तरी त्याच जागांवर होईल जिथे सध्या भाजप खासदार आहेत असे संकेतही त्यांनी दिले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सहा जागांपैकी तीन जागा भा तर तीन जागा नेशनल कॉन्फरन्सला मिळाल्या होत्या. आता जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्गठननंतर लडाख केंद्रशासित प्रदेश झाला आहे आणि एक जागा कमी झाली आहे. आता जम्मू काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्सच्या तीन जागा सोडल्या तर राहिलेल्या दोन जागांसाठी तीन दावेदार आहेत. अशावेळी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप कसे होणार हा मोठा प्रश्न आहे.
इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल? कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पक्षाने फेटाळल्या
‘समाजवादी’नेही दिला जोरदार धक्का
इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी, आम् आदमी पार्टी, शिवसेना (उबाठा), जनता दल युनायटेड आणि डावे पक्ष हे पक्ष सोडले तर बाकीचे पक्ष याआधी यूपीए आघाडीत होते. समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांनी याआधी यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबाही दिला होता. आता सध्याचे चित्र पाहिले तर नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीने उमेदवारांची एक यादी जारी केली आहे. समाजवादी पार्टीचा हा निर्णय इंडिया आघाडीसाठी एक मेसेज म्हणून पाहिला जात आहे.
आप अन् नॅशनल कॉन्फरन्सचाही मूड बदलला
नॅशनल कॉन्फरन्स आणि आम् आदमी पार्टी सुद्धा याच मूडमध्ये आहेत. अशा परिस्थितीत आता एक प्रश्न समोर येत आहे की इंडिया आघाडीकडे काय शिल्लक राहिले आहे. तर राजकीय जाणकारांच्या मते उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, पंजाब आणि दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आघाडीचा समन्वय बिघडला आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादवच सगळे निर्णय घेत आहेत, दुसऱ्या पक्षांना किती जागा द्यायच्या हे सुध्दा तेच ठरवत आहेत. अशा मनमानी पद्धतीने आघाडी चालत नाही ही गोष्ट बहुधा अखिलेश यादव विसरले असावेत. आम् आदमी पार्टी कधी धक्का देईल सांगता येत नाही.
महाराष्ट्रातील फाटफुटीने आघाडी संकटात
महाराष्ट्रात आपले पक्ष आणि चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार मागील निवडणुकीत जितक्या जागा होत्या तितक्या जागांची मागणी करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही गटांची ताकद कमी आहे. तरीदेखील जागावाटपात मवाळ भूमिका घेण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात आघाडीचे भवितव्य संकटात दिसत आहे.
दुसरीकडे भाजप नेतृत्वातील एनडीएनेही जुने आणि नवीन मित्र जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. भाजपने नितीश कुमार यांना पुन्हा आपल्याबरोबर घेतले आहे. महाराष्ट्रातही काही मोठे नेते भाजपसोबत आले आहेत. आगामी काळात आणखी काही पक्ष सोबत येतील अशी शक्यता दिसत आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, अशात दोन्ही आघाड्यांचे चित्र काय असेल याचे उत्तरही लवकरच मिळेल.