Amit Shah : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. चार टप्प्यातील मतदान झालं आहे. पाचव्या टप्प्यासाठी राजकीय पक्ष तयारी करत आहेत. या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या तोंडून नेहमीच चारशे पारचा नारा दिला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) ही घोषणा केली आहेच. मग सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप खरंच चारशे पार जाईल का? पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भाजपाचा प्लॅन बी काय असेल? यावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी तर भाजपला दोनशेही जागा मिळणार नाहीत अशी भविष्यावाणी केली आहे. या चर्चांवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) मौन सोडलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी याबाबत सविस्तर मत व्यक्त केलं.
शाह म्हणाले असे काही होईल असे आजिबात वाटत नाही. त्यामुळे भाजपला कोणत्याही प्लॅन बी ची काहीच गरज नाही. भाजपला २७२ पेक्षा कमी जागा मिळाल्या तर पुढे काय रणनिती असेल या प्रश्नावर अमित शाह यांनी स्पष्ट उत्तर दिले. मला अशी कोणतीच शक्यता दिसत नाही. देशातील ६० कोटी लाभार्थ्यांची फौज पीएम मोदींच्या बरोबर आहे. त्यांची कोणतीच जात किंवा गट नाही. ज्यांना हे सगळे लाभ मिळालेत त्यांना चांगलं माहिती आहे की नरेंद्र मोदी कोण आहेत आणि चारशे जागा का दिल्या पाहिजेत.
जर भाजपला बहुमत मिळालं नाही तर पुढील प्लॅन काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमित शाह म्हणाले, पक्षाची पहिलीच योजना यशस्वी होणार आहे. प्लॅन बी तेव्हाच तयार केला जातो ज्यावेळी प्लॅन ए यशस्वी होण्याची शक्यता ६० टक्क्यांपेक्षा कमी असेल. पण मला विश्वास आहे की पीएम मोदी प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येतील. पीएम मोदी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचे सर्वात मोठे समर्थक आहेत.
काँग्रेस उत्तर दक्षिण विभाजन करण्याचा कुटील डाव खेळत आहे. भाजप केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक या राज्यांत सर्वात मोठा पक्ष ठरेल. जर कुणी असं म्हणत असेल की हा प्रांत एक वेगळा देश आहे तर त्यांचे असे वक्तव्य अत्यंत आपत्तीजनक म्हटले पाहिजे. काँग्रेस पक्षाचे एक मोठ्या नेत्याने उत्तर आणि दक्षिण भारताचे विभाजन करण्याचे वक्तव्य केले होते. परंतु, काँग्रेसने या वक्तव्यावर काहीच स्पष्टीकरण दिले नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; अमित शाहांचा हल्लाबोल
देशातील जनतेला काँग्रेसच्या या अजेंड्यावर विचार करण्याची गरज आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक या पाच राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. देशाच्या राजकारणात स्थिरता आणण्याच्या उद्देशाने ४०० पेक्षा जास्त जागा पाहिजे आहेत. या जागांसह भाजप देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचा प्रयत्न करील. भारताला जगात तिसरी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आणि देशातील गरीबांचे कल्याण करण्यासाठी भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत.